नांदेड(प्रतिनिधी)-घराची नोंद नमुना क्रमांक ९ मध्ये घेण्यासाठी तीन हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक आणि लाच देण्यासाठी प्रोत्साहीत करणारा सरपंच आणि सेवक असे तिघे तिन हजारांची लाच घेताना जेरबंद झाले आहेत. हा घटनाक्रम इजळी ता.मुदखेड गावात घडला आहे.
२७ ऑक्टोबर रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या घराची नोंद ग्राम पंचायत कार्यालयातील नमुना क्रमांक ९ या रजिस्टरमध्ये घेण्यासाठी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत आहेत. या लाच मागणीची पडताळणी १६ नोव्हेंबर रोजी झाली. सोबतच लाच मागणार्या ग्रामसेवकाला लाच देण्यासाठी इजळीचे सरपंच नागेश रामदास घुळेवाड आणि सेवक आनंदा दत्तराम मुंगल यांनी प्रोत्साहन दिल्याचे सुध्दा निष्पन्न झाले. आज इजळीचे ग्रामसेवक रुस्तुम चांदेजी दिपके (३२), सरपंच नागेश रामदास गुळेवाड (२२) आणि सेवक आनंदा दत्तराम मुंगल (४२) हे सर्व हजर असतांना ग्रामसेवक दिपकेने तडजोडीनंतर ३ हजार रुपये लाच स्विकारली. लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातील अधिकारी व अंमलदारांनी या तिघांना सध्या ताब्यात घेतले आहे. लाच प्रकरणी या तिघांविरुध्द मुदखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत सुरू होती.
३ हजारांची लाच घेणार्यां तिघांना पकडण्याची कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधिक्षक धर्मसिंह चौहाण, राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राहुल पखाले, पोलीस अंमलदार संतोष शेट्टे, गणेश तालपोकुलवार, सचिन गायकवाड, ईश्वर जाधव, नरेेंद्र बोडके, शेख मुजीब यांनी पार पाडली.
लाचेतील तिन लोकांना पकडल्याची माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असतील आणि त्यांनी लाच मागल्याप्रकरणीची मोबाईल फोनवर बोलणे झाले असेल, एस.एम.संदेश आदान प्रदान झाले असतील तसेच ऑडीओ किंवा व्हिडीओ क्लिप असतील तर ही भ्रष्टाचाराची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी तसेच माहिती अधिकार संंदर्भाने कोणत्याही शासकीय अधिकारी आणि कर्मचार्याबाबत शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल तर त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती द्यावी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४(२) कार्यालयाचा फोन क्रमांक ०२४६२-२५३५१३ यावर ही माहिती देता येईल. तसेच पोलीस उपअधिक्षक धर्मसिंग चव्हाण यांच्या मोबाईल क्रमांक ९९२३४१७०७६ यावर सुध्दा माहिती देता येईल. तसेच एस.सी.बी.च्या संकेतस्थळावर सुध्दा अशा प्रकरणांची माहिती देता येईल. एसीबीच्या फेसबुक पेजवर ही माहिती सांगता येईल.