नांदेड(प्रतिनिधी)-एका कौटूंबिक संपत्ती वादातून चार जणांविरुध्द खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्थावर संपत्ती आपल्या नावावर करून घेतल्याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी न्यायालयातून हुकूम नामा झाला असतांना त्याला लपवून या संपत्तीचा अपहार करण्यात आला होता. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आनेकर यांनी 16 दिवसात अपील प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा आज 16 नोव्हेंबर रोजी दाखल केला आहे.
कुंदा सुरेश मोंडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कुटूंबात सुरु असलेल्या संपत्ती वादामध्ये दिवाणी दावा क्रमांक 86/2012 मध्ये तडजोडीनंतर हुकूमनामा झाला. या हुकूमनाम्याला लपवून त्यांच्या कुटूंबातील जनार्धन तुळशीराम मोंडे, रमेश तुळशीराम मोंडे, मनिष तुळशीराम मोंडे आणि विठ्ठल मोनप्पा शेट्टी या चौघांनी मिळून खोटे बनावट मृत्यू प्रमाणपत्रच्या आधारावर इतर कार्यालयीतील लोकांना अंधारात ठेवून अनेक संपत्ती विक्री केल्या, संपत्तीचे नाव परिवर्तन करून घेतले. पोलीस ठाण्यांना या बाबत तक्रारी दिल्यानंतर सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नाही आणि म्हणून आम्ही न्यायालयात दाद मागतो आहोत असे सांगितले.
या अर्जावर न्यायालयात 27 ऑक्टोबर 2021 रोजी निर्णय दिला आणि जनार्धन तुळशीराम मोंडे, रमेश तुळशीराम मोंडे, मनिष तुळशीराम मोंडे आणि विठ्ठल मोनप्पा शेट्टी या चौघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 417, 420, 464, 467, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दिले.
परंतू या दोघांनी अर्थात रमेश तुळशीराम मोंडे आणि मनिष रघुनाथ मोंडे यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. या अपील प्रकरणात अपीलकर्त्यांची बाजू ऍड. व्ही.डी. पाटनूरकर यांनी मांडली. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. आशिष गोदामगावकर यांनी बाजू मांडली तर मुळ फिर्यादी तथा अपील प्रकरणातील प्रतिवादीतर्फे ऍड.एस.ए.नेवरकर यांनी बाजू मांडली.
हे अपील जिल्हा न्यायालयातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अनेकर यांच्यासमक्ष 30 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. या अपील प्रकरणाचा निकाल जिल्हा न्यायालयाने फक्त 16 दिवसात दिला. त्यात न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या 27 ऑक्टोबरच्या आदेशात मला दखल देण्याची गरज नाही असे नमुद केले. कुटूंबातील आपसात असलेला हा वाद आणि त्यानुसार कागदपत्रांच्या आधारावर समोर आलेल्या घटनेनुसार खोटे कागदपत्र तयार झाल्याचे दिसते असे लिहिले. या आदेशावर 15 नोव्हेंबर रोजी स्वाक्षरी झाली आहे.
यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 450/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
कुटूंबाची संपत्ती परस्पर नाव परिवर्तन करणाऱ्या चार जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल