नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात घडलेल्या १२ नोव्हेंबरच्या घटनेची आज आग अद्याप शांत झाली नाही. पण एका पोलीस कर्मचार्याने कांहीच माहिती न घेता रुग्णाची गरज म्हणून आज केलेल्या कामाचे निरिक्षण या आगीत काम करणार्या प्रत्येकाने करावे जेणे करून त्यांच्या डोळ्यात अंजण आपोआपा घातले जाईल.
नांदेड शहरातील पोलीस ठाणे वजिराबाद येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार प्रदिप खानसोळे हे आपल्या घरी तुळशी विवाहची पुजा करत असतांना सायंकाळी ६ वाजता समर्थ रक्तदान व्हॉटसऍप गु्रपवर एक संदेश आला की, शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे उपचार घेणार्या एका महिलेला ए पॉझिटीव्ह रक्ताची गरज असल्याचा संदेश आला.
पोलीस नोकरी करता-करता प्रदीप खानसोळे हे आपल्या घरातील तुळशी विवाह पुजा संपन्न करण्यासाठी घरी होते. तरी त्यांनी त्यांचा रक्तगट ए पॉझिटीव्ह असल्याने त्या व्हॉटसऍप संदेशावर होकार दर्शवला. त्यांच्या मागे लगेच कॉलवर कॉल सुरू झाले आणि लवकर येण्याची सुचना त्यांना वारंवार मिळत राहिली. जवळपास ७.३० च्या सुमारास प्रदीप खानसोळे विद्युत प्रवाहाच्या गतीने विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात पोहचले. त्यांना आलेल्या माहितीनुसार त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि तेथील रक्तपेढीमध्ये आपले रक्तदान प्रदान केले. जेवढ्या विद्युत गतीने प्रदीप खानसोळेने आपले रक्त एका रुग्णासाठी प्रदान केले होते. त्यापेक्षा दुप्पटगतीने वैद्यकीय अधिकारी आणि परिचारकांनी ते रक्त त्या महिलेला पोहचविले.
आम्ही ही बातमी लिहितांना १२ नोव्हेंबरच्या घटनेचा उल्लेख करून सुरूवात केली आहे आणि वाचकांना धक्का सुध्दा इथेच लागणार आहे की, त्या रुग्ण महिलेचे नाव रुखसाना (काल्पनीक नाव) असे आहे. या महिलेचे गाव सुध्दा आम्हाला माहित आहे पण आम्ही ते लिहुन त्यांची ओळख पटवू इच्छत नाही. सोबतच या महिलेचा पत्ता सुध्दा आम्हाला माहित आहे पण आम्ही तिची ओळख प्रसिध्द करू इच्छत नाही. या महिलेला कोणत्या उपचारासाठी या रक्ताची गरज होती हे सुध्दा लिहिण्याची आमची इच्छा नाही. पण या संदर्भाने आम्ही हे नक्की मांडू इच्छीतो की, १२ नोव्हेंबरला लागलेल्या आगीत तेल ओतण्याऐवजी अशा पध्दतीने पाणी टाकून प्रदीप खानसोळेने तयार केलेला आदर्श नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. प्रदीप खानसोळेने केलेल्या या कामाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांच्यासह अनेक अधिकारी, पोलीस अंमलदार आणि जनतेतील प्रदीप खानसोळेचे मित्र यांनी त्यांचे कौतुक केले आहे.