नांदेड,(प्रतिनिधी)- आज मध्यरात्री नंतर २ वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेने नामांकित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन बायो डिझेलचे टँकर पकडून नेले आहेत.त्यानंतर मात्र नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एक छोटासा बायो डिझेल टँकर पकडून ठेवलेला आहे.
अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज मध्यरात्री नंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंढार शिवारात तीन बायो डिझेल टँकर पकडले.या प्रत्येक टँकर मध्ये २४ हजार लिटर बायो डिझेल होते.नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत काय चर्चा झाली हे मात्र कळले नाही.नंतर बीड जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखा पथक ७२ हजार लिटर बायो डिझेल भरलेले टँकर सोबत घेऊन पुन्हा बीड कडे रवाना झाले आहेत म्हणे.आता वृत्त लिही पर्यंत तर ते बीड येथे पोहचले पण असतील. नांदेड जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेची स्वप्ने पाहणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या हद्दीत बीड स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून जबरदस्त कार्यवाही केली आहे. पण त्यांनी नांदेड हद्दीत तीन टँकर पकडले तरीही गुन्हा मात्र नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेला नाही. अशोक घोरबांड यांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पडणारे स्वप्न मे २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचे चिन्ह सध्यातरी दिसत नाहीत.
.. आणि जाग आली नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेला
बीडचे पोलीस पथक आपल्या जिल्ह्यातून ७२ हजार लिटर बायो डिझेल भरलेले तीन टँकर २०० किलो मीटर पाठलाग करून घेऊन गेले हे माहित झाल्या नंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने बोंढार शिवारातून वाहन क्रमांक एमएच ३८ इ १४३८ हा छोटा बायो डिझेल टँकर पकडला आहे. या वाहनात फक्त १२०० लिटर बायो डिझेल आहे.नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने अद्याप वृत्त लिही पर्यंत तरी गुन्हा दाखल केला नव्हता.