नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे एक दुकान फोडून चोरट्यांनी 40 हजार रुपयांचे साहित्य चोरले आणि 6 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. बामणी फाटा ता.हदगाव येथे एक दुकान फोडून चोरट्यांनी 50 हजार रुपये रोख चोरले आहेत. वसंतनगर नांदेड भागात तीन दरोडेखोरांनी बळजबरीने एक मोबाईल लुटून नेला आहे.
विवेक लक्ष्मण कार्ले हे विद्यार्थी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता वसंतनगर भागातून यशवंत महाविद्यालयाकडे पायी जात असतांना मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 बी.एच.2592 वरील तीन अनोळखी चोरट्यांनी ज्यांचे वय 18 ते 19 वर्ष असेल त्यांनी विवेक कार्लेला मारहाण करून त्याच्याकडील 10 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रोडे अधिक तपास करीत आहेत.
साहेबराव दत्तराम अडलंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बामणी फाटा ता.हदगाव येथे त्यांची गोपाळ ड्रेसेस ऍन्ड साडी सेंटर अशी दुकान आहे 17 नोव्हेंबरच्या सायंकाळी 7 ते 18 नोव्हेंबरच्या सकाळी 8.30 वाजेदरम्यान त्यांच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी त्यांच्या कॉन्टरमधील 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. मनाठा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार एम.ए.पवार अधिक तपास करीत आहेत.
हिमायतनगर येथील व्यंकट गंगाराम तोटवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 नोव्हेंबरच्या रात्री त्यांच्या प्रयोगशाळेच्या दुकानाबाहेर दरवाज्याचे कुलूप तोडून तीन ते चार चोरट्यांनी आतील सीसीटीव्ही कॅमेरे हार्डडिस्क असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. सोबतच चोरट्यांनी तेथे अनेक साहित्यांची तोडफोडून करून 6 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सिंगनवाड अधिक तपास करीत आहेत.
या व्यतिरिक्त जिल्ह्यात कांही दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. सोबतच कांही मोबाईल चोरट्यांनी लंपास केलेले आहेत.
हिमायतनगर आणि बामणी फाटा येथे दुकान फोडले