नांदेड (प्रतिनिधी)- अनेक दरोडे करून फरार असलेल्या अनिल पंजाबीला लोहा पोलिसांनी पकडल्यानंतर लोह्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एम. गायकवाड यांनी त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पोलीस अंमलदार माधव डफडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 20 नोव्हेंबर रोजी रात्री लोहा-पालम रस्त्यावर आपल्याकडे दोन बंदुकी बाळगून गावात दहशत निर्माण करणाऱ्या अनिल सुरेश पवार उर्फ पंजाबी (28) यास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूसे सापडली. लोहा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 238/2021 भारतीय हत्यार कायद्यानुसार दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्याकडे देण्यात आला आहे.
आज 22 नोव्हेंबर रोजी संतोष तांबे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी अनिल पंजाबीला लोहा न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असताना न्यायाधीश गायकवाड यांनी अनिल पंजाबीला दोन दिवस अर्थात २४ नोव्हेंबर २०२१पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि. 20 नोव्हेंबरच्या रात्री कंधार आणि सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जबरी चोऱ्या झाल्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशाने पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीनंतर अनिल सुरेश पंजाबीला पकडण्यात पोलिसांना यश आले होते. अनिल पंजाबीने केलेल्या खंडीबर दरोड्यांची उकल आता होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
दरोडेखोर अनिल पंजाबीला पोलीस कोठडी