
नांदेड(प्रतिनिधी)-1 जानेवारी 2015 रोजी मध्यरात्री सरकारी रुग्णालय उमरी येथे दारु पिऊन जनतेला त्रास देणाऱ्याला उमरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श.स.धपाटे यांनी चांगल्यावर्तणूकीच्या बंदपत्रावर सध्या मुक्त केले आहे. या बंद पत्राचे उल्लंघन झाल्यास त्या विरुध्द शिक्षेची कार्यवाही केली जाईल.
दि.1 जानेवारी 2015 रोजी मध्यरात्री सरकारी ग्रामीण रुग्णालय उमरी येथे दारु पिऊन त्या नशेत आरडाओरड करून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करून शांतता भंग करणाऱ्या अनिल अमृतराव मारावार (वय 27) यास पोलीसांनी पकडले. पोलीस अंमलदार चंद्रभान गंगाधर पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिल मारावारविरुध्द न्यायालयात खटला क्रमांक 31/2015 दाखल करण्यात आला. त्यादिवशी पांचाळ सोबत पोलीस अंमलदार पवार सुध्दा होते. अनिल मारावारची वैद्यकीय तपासणी झाली आणि न्यायालयात पाच साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवल्यानंतर मारावारने ग्रामीण रुग्णालय उमरी येथे दारु पिऊन शांतता भंग केल्याचा प्रकार निष्पन्न झाला. पण त्याला आजच शिक्षा न देता त्याने एक वर्ष चांगल्या वर्तणूकीने वागावे असे बंद पत्र लिहुन घेण्यात आले आणि सध्या त्याची सुटका झाली आहे. त्याने बंद पत्राचे उल्लंघन केले तर त्याला शिक्षा देण्यात येईल.