
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रा तील सहा जिल्ह्यांमध्ये चार महानगरपालिकेतील चार रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक अधिसुचना जारी झाली आहे. धुळे, नांदेड-वाघाळा, अहमदनगर आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक-एक प्रभांगासाठी या निवडणुका होणार आहेत. या पोट निवडणुकीच्या अधिसुचनेवर राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांची स्वाक्षरी आहे.
राज्यात धुळे येथील 5-ब, अहमदनगर येथील 9-क, नांदेड-वाघाळा येथे 13- अ, सांगली मिरज-कुपवाड येथे 16 अ अशा चार निवडणुकांसाठी अधिसुचना जारी झाली आहे.आजपासूनच या निवडणुकीतील क्षेत्रात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या प्रभागांच्या हद्दीत मतदारांवर विपरीत परिणाम करेल असे कोणतेही कृत्य मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक करू शकणार नाहीत.
या निवडणुकीसाठी महानगरपालिका आयुक्तांनी कार्यक्रमाची अधिसुचना स्थानिक राजपत्र व वर्तमानपत्रांमध्ये 29 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करायची आहे. 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर नामनिर्देशनपत्र आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर भरण्याकरीता उपलब्ध असतील. 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरमध्ये 5 डिसेंबर हा रविवार आहे तो दिवस सोडून इतर दिवशी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येतील त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 अशी आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. वैधरित्या नामनिर्देशीत झालेल्या उमेदवारांची याती 7 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होईल. उमेदवारी मागे घेण्याचा दिवस 9 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. निवडणूक चिन्ह नेमूण देण्याचा दिनांक 10 डिसेंबर असा आहे. अंतिमरित्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 10 डिसेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. आवश्यक झाल्यास 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेदरम्यान निवडणुक मतदान होईल. मतमोजणीचा निकाल जाहीर करणे यासाठी 22 डिसेंबर 2021 ही तारीख देण्यात आली आहे. 28 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द होणार आहे.
नांदेड येथील प्रभाग क्रमांक 13 अ मध्ये नगरसेवक असलेल्या गंगाबाई सोनकांबळे यांचे 26 जानेवारी 2020 रोजी निधन झाले होते. म्हणून ती जागा रिक्त आहे. गंगाबाई सोनकांबळे या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक होत्या. नवीन निवडून आलेल्या नगरसेवकाला मनपाच्या उर्वरित कालावधीसाठीच नगरसेवक पद प्राप्त होणार आहे.