
नांदेड(प्रतिनिधी)-आपसातील जुन्या वादाच्या कारणातून एका 21 वर्षीय युवकाचा खून 24 वर्षीय व्यक्तीने गोविंदनगर नाल्याजवळ केला आहे. विमानतळ पोलीसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
निलाबाई भगवान गोरेकर (55) रा.गोविंदनगर नाल्याजवळ नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माझा मुलगा कृष्णा भगवान गोरेकर (21) हा ज्या फायनान्समध्ये काम करतो त्या राजू महाराजचा जन्मदिन पाच ते सहा महिन्याअगोदर होता. त्या ठिकाणी अमोल नारायण बुक्तरे (24) याचे आणि माझा मुलगा कृष्णाचे भांडण झाले होते. त्यावेळेस आम्ही कांही तक्रार दिली नव्हती. दि.24 नोव्हेंबरच्या रात्री 10 ते 10.30 वाजता मी घरी असतांना माझ्या गल्लीतील एका बालकाने कृष्णाला लई मारले असे सांगून मला गोविंदनगर नाल्याजवळ नेले. त्या ठिकाणी गल्लीमध्ये रक्तच दिसले. माझा मुलगा कृष्णा गोरेकर रक्तबंबाळ होवून पडलेला होता. तेंव्हा गल्लीतील कांही लोकांनी त्याला दवाखान्यात घेवून गेले. काय झाले याची विचारणा केली तेंव्हा माझ्या गल्लीतील एका युवकाने सांगितले कृष्णाला अमोलने घावने मारले आहे. त्यावेळी अजूनही दुसरे लोक होते पण ते भितीमुळै पळून गेले आहेत. सरकारी दवाखान्यात जावून पाहणी केली असता माझा मुलगा कृष्णा मरण पावला होता. त्याच्या दोन्ही मांड्यावर घाव करून मोठ्या जखमा होत्या आणि याच जखमांनी त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा खून अमोल नारायण बुक्तरे या युवकाने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक संजय ननवरे, पोलीस अंमलदार बाबा गजभारे, दारासिंग राठोड, कलंदर यांच्यासह अनेक पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी जावून सर्व तपासणी केली आणि अमोल बुक्तरेला ताब्यात घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विमानतळ पोलीसांनी मात्र या ताब्यातील माहितीला दुजोरा दिलेला नाही.