नांदेड(प्रतिनिधी)-किनवट शहरातील एक घरफोडून चोरट्यांनी 55 हजारांचा ऐवज चोरला आहे. देगलूर रोड नरसी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 64 हजारांचा ऐवज लांबवला आहे. महालिंगी ता.कंधार येथे एक घरफोडून चोरट्यांनी 67 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरला आहे. मालेगाव रोड नांदेड येथून एक 15 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. सर्व चोरी प्रकारांमध्ये मिळून 2 लाख 7 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पांडूरंग साहेबराव सुर्यवंशी हे पुण्याला गेले असतांना 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 10 या वेळेदरम्यान त्यांचे घरफोडून चोरट्यांनी कपाटातील 5 हजार रुपये रोख रक्कम आणि 50 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कोलबुध्दे अधिक तपास करीत आहेत.
रामा विठ्ठल वडुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते शेतात काम करण्यासाठी गेले असतांना 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेदरम्यान त्यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीवर चढून कोणी तरी चोरट्याने पत्रा काढला आणि घरातील एका दरवाज्याचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम तसेच एक मोबाईल असा 64 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव अधिक तपास करीत आहेत.
महालिंगी ता.कंधार येथील संग्राम मोतीराम दुपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 नोव्हेंबरच्या सायंकाळी 5 ते 5.30 या अर्ध्या तासाच्या वेळेत त्यांची आई घराचे दोन्ही रुम कुलूप लावून गावालगत असलेल्या आखाड्यावर म्हशीच्या वगारीला पाणी पाजण्यासाठी घेवून गेली. ऐवढ्याच वेळात कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी पेटी तोडून त्यातील 60 हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या व संसार उपयोगी भांडे किंमत 7 हजार 550 रुपयंाच्या चोरून नेल्या आहेत. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार टाकरस अधिक तपास करीत आहेत.
नांदेड शहरातील मालेगाव रस्त्यावरील लक्ष्मी कंपाऊंडमध्ये उभी असलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.पी.8119 ही 15 हजार रुपये किंमतीची गाडी 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 ते 5 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. यादवराव बाजीराव कल्याणकर यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार शिरसाट हे करीत आहेत.
तीन घर फोडले ; एक दुचाकी चोरी ; 2 लाख 6 हजारांचा ऐवज लंपास