नांदेड,(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका युवकाला पकडून त्याच्याकडील चोरीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक दुचाकी चोरीचा गुन्हा निष्पन्न झाल्याने तो दुचाकी चोर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
24 नोव्हेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक नेहमीप्रमाणे गस्त करीत असतांना त्यांना एक युवक संशयीत वाटला. त्याचे नाव आकाश मंगल पवार (19) असे आहे. त्याच्याकडील पलसर गाडीबाबत तपासणी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे त्याने सांगितले. एकच नव्हे तर त्याने दोन दुचाकी गाड्या चोरी केल्या होत्या. त्या दोन्ही दुचाकी गाड्या वजिराबाद पोलीसांना काढून दिल्या आहेत. या संदर्भाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा क्रमांक 462/2021 दाखल असल्याने पकडलेला दुचाकी चोर आकाश मंगल पवार आणि दोन्ही दुचाकी गाड्या शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत.
या दुचाकी चोराला पकडणाऱ्या पथकात वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार बालाजी कदम, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लुरोड, व्यंकट गंगुलवार हे सहभागी होते. प्रभारी पोलीस अधिक्षक यशवंत काळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.