नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिअलटेक हे दुकान फोडून चोरट्यांनी 10 लाख 79 हजार 895 रुपयांचा ऐवज चोरला आहे. वजिराबाद भागातील एका गुत्तेदाराच्या कामासाठी रस्त्यावर मोकळ्या जागेत असलेले 48 हजार रुपये किंमतीचे सहा लोखंडी पोल चोरून नेण्यात आले आहेत. तसेच गोदावरी नदीपात्राजवळ, गोवर्धनघाट येथे ठेवलेले 24 हजार रुपये किंमतीचे तीन लोखंडी पोल चोरून नेण्यात आले आहेत.
नंदीग्राम रियलटेक प्रा.लि. या दुकानाचे मालक अनिकेत साहेबराव बिरगाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 नोव्हेंबरच्या रात्री ते आपले दुकान बंद करून घरी गेले आणि 25 नोव्हेंबरच्या पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याची माहिती प्राप्त झाली असता येवून तपासणी केली तेंव्हा त्या दुकानातील 31 एलईडी टीव्ही आणि 4 होमथेटर टी.व्ही. असा 10 लाख 79 हजार 895 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आलेला होता. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
गंगाधर चांदू लोणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 नोव्हेंबरच्या रात्री 1 ते 24 नोव्हेंबरच्या पहाटे 6 वाजेदरम्यान बौध्द विहार पक्कीचाळ येथे ठेवलेले सहा लोखंडी खांब 48 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
अनिरुध्द निवृत्तीराव जोंधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गोदावरी नदी पात्रात त्यांचे ठेवलेले 20 फुट लांबीचे तीन लोखंडी पोल 24 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंंमलदार राठोड करीत आहेत.
दुकान फोडून 31 एलईडी चोरले; किंमत 10 लाख 80 हजार