नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शेत मजुर युनियन (लालबावटा) या संघटनेच्यावतीने दि.28 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय दलित हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन कॉ.सुबोध मोरे यांच्या हस्ते होणार आहे.
लालबावटा संघटनेच्यावतीने उद्या दि.28 नोव्हेंबर रोजी नांदेड येथील पीपल्स कॉलेज येथे सकाळी 11 वाजता खुल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कॉ.सुबोध मोरे यांच्याहस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रमुख मार्गदर्शन केंद्रीय सहसचिव कॉ.विक्रमसिंघ हे करतील. राज्याध्यक्ष कॉ.मारोती खंदारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. या खुल्या दलित हक्क परिषदेच्या सत्रात उपस्थित राहण्याचे आवाहन कॉ.विनोद गोविंदवार यांनी केले आहे. भुमिहिन तसेच अत्यल्प आणि अल्पभुधारक शेत मजुरांचे रोजगार त्यांची वेतन वाढ, त्यांच्यासाठी जमीन, राहण्यासाठी घर, स्वस्त धान्य, आरोग्य सुविधा आदी विषयांवर या खुल्या सत्रात चर्चा होणार आहे. शेत मजुर वर्गात सर्वाधिक संख्या ही दलित समुदायातून येते. शेत मजुर वर्गामध्ये दलित समुहातून येणाऱ्या शेत मजुरांचे प्रश्न हा एक स्वतंत्र विषय आहे. अनुसूचित शेत मजुरांचे शोषण, वर्गीय, जातीय आणि महिलांचे लैंगिक शोषण होत असते. त्यासंदर्भाने या खुल्या चर्चा सत्रात मार्गदर्शन होणार आहे. सध्याची बदलती परिस्थिती आणि त्या अनुषंगाने अनुसूचित वर्गाच्या सोशनाचे स्वरुप सुध्दा बदलले आहे. अशा परिस्थितीला समजून शोषणाविरुध्द काय करावे यासाठी या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे आयोजन राज्य समितीच्या मार्गदर्शनात नांदेड युनियनच्यावतीने नांदेड येथे महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनी अर्थात 28 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे खुले चर्चा सत्र सकाळी 11 वाजता नांदेड येथील पीपल्स कॉलेज येथ सुरू होईल. या चर्चा सत्रात सर्वांना सहभागी होण्यासाठी लालबावटा संघटनेने निमंत्रण दिले आहे.