नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अत्यंत नामांकित आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षकाच्या हद्दीत आता मोदकांची केंद्रीकृत जमवा जमव करण्यात येत असून संपुर्ण मोदक जमा झाल्यानंतर प्रसाद म्हणून त्यांचा वाटप सुरू झाला आहे. त्यामुळे मोदकांमुळे होणारी समस्या कांहीशी कमी होईल.
पोलीस ठाण्यांमध्ये मोदकांचा नैवेद्य हा नवीन प्रकार नाही. आप-आपल्या परीने सर्व जण मोदकांचा नैवेद्य घेत होते आणि त्यातील अर्ध्ये मोदक आपल्या प्रभारी अधिकाऱ्याला देतात ही एक प्रथा भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरू आहे. त्यात कांही जण मोदक म्हटले की, नाक मुरडतात त्यांना मुर्ख समजले जाते. पण साहेब सांगतो म्हणून ऐकावे लागते आणि जगात हा प्रकार सहज आहे त्याला वाईट विचार करण्याची गरज नाही असा विचार केला जातो. पण प्रत्येकाने मोदक जमा करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता एका प्रभारी अधिकाऱ्याने मोदक नैवेद्याची जमवा-जमव एकत्रीत केली आणि त्यानंतर उर्वरीतांना प्रसाद रुपाने ते मोदक वाटले जातत अशी एक नवीन प्रथा सुरूवात करण्यात आली आहे.
मागे 80 च्या दशकात आणि त्यापुर्वी अशीच पध्दत होती. पण ती पध्दत पोलीस ठाण्यातील प्रत्येकाला मोदकाचा प्रसाद मिळेल अशा स्वरुपाची होती. आता बीट मार्शल, पोलीस उपनिरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक अशा पध्दतीने या मोदकांचा नैवेद्य वाटप होत आहे. प्राप्त झालेल्या अत्यंत खात्रीलायक माहिती नुसार बीट मार्शलला पाच मोदक, पोलीस उपनिरिक्षकाला दहा मोदक आणि सहाय्यक पोलीस निरिक्षकाला 15 मोदक देण्यात येत आहेत. सुरूवात करण्यात आलेली पध्दत अत्यंत चांगली आहे. पण उल्लेखीत पदनामांपेक्षा इतर पोलीस अंमलदारांना या मोदकांचा प्रसाद दिला जात नाही. नोंव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या या नवीन प्रथेचा दुसरा महिना आज 1 डिसेंबर 2021 पासून सुरू झाला आहे. मोदकांचा प्रसाद घेणाऱ्यांवर बऱ्याच जबाबदाऱ्यापण आहेत. कारण प्रसाद घेतला तर त्यानंतर त्यांना आपल्या जबाबदाऱ्या सुध्दा पुर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यात चुकीचे काय?.