पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झालेल्या एका 23 वर्षीय युवकाने तोरणा ता.बिलोली येथे गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपुर्वी त्याने मी का आत्महत्या करत आहे. या संदर्भाचे एक चलचित्र बनवून आत्महत्या केली आहे. रामतिर्थ पोलीसांनी याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
गणेश नारायण नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरी भागेश्र्वर गणेश नरवाडे (23) याने आत्महत्या केली. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तो त्या मुलीसोबत पळून गेला होता. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भागेश्र्वर नरवाडेविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यांच्या तारखांसाठी न्यायालयात जातांना सिडको नांदेड येथील बालाजी काठवडे, गोविंद कराड, गजानन काठवडे, अविनाश सोनवणे, आणि मारोती कोंडामंगले हे सर्व त्याला त्रास देत असत आणि या धमक्यांना कंटाळून त्याने 29 नोव्हेंबरच्या रात्री आपल्या तोरणा येथील घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येपुर्वी भागेश्र्वर न रवाडेने एक व्हिडीओ बनवून आपल्या आत्महत्येचे कारण सांगितले आहे. ज्यामध्ये हे पाच लोक जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
रामतिर्थ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2021 भारतीय दंडसंहितेच्या कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव अधिक तपास करीत आहेत. वृत्त लिहिपर्यंत या आरोपींना अटक झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही.
29 नोव्हेंबर रोजी हा प्रकार गणेश नारायण नरवाडे यांच्या घरात घडला यासोबतच त्यांच्या बालाजी मेडीकलमध्ये चोरी करून चोरट्यांनी चार हजार रुपये रोख रक्कम लांबली असे दोन प्रकार एकाच दिवशी गणेश नारायण नरवाडे यांच्या घरी घडले. चोरीच्या गुन्ह्याचा क्रमांक 250/2021 असा आहे.