रामतिर्थ येथे 75 वर्षीय महिलेचा खून करणारा एका आठवड्यात गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे रामतिर्थ पासून हाकेच्या अंतरावर एका 75 वर्षीय महिलेचा खून करून तिच्या अंगावरील जवळपास 20 हजारांचे दागिणे लुटून नेणाऱ्या मारेकऱ्याला रामतिर्थ पोलीसांनी तेलंगणातील बोधन येथून पकडून आणले आहे.
दि.2 डिसेंबरच्या सकाळी 75 वर्षीय महिला अनवरबी मैनोद्दीन शेख या महिलेचा तिच्या गळ्यातील ओढणीने तोंड बांधून लाकडाने जबर वार करून तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला. प्राथमिक दृष्ट्या या महिलेच्या अंगावर असलेले वेगवेगळे दागिणे चोरण्याच्या उद्देशातून हा खून घडला असावा. अनवरबीच्या घरात बसूनच दारु पिऊनच तिचा खून केल्याची घटना दिसत्या परिस्थितीवरून पोलीसांनी लक्षात घेतली. गेली चार वर्ष अनवरबी एकट्याच राहत होत्या. या प्रकरणी रामतिर्थ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला.
रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी या घटनेला सविस्तरपणे समजून घेऊन आपल्या पोलीस प्रशिक्षणातील कसब पणाला लावले आणि शेख गौस रसुल साब (34) या रामतिर्थ येथील चालकाला बोधन, तेलंगणा येथून पकडून आणले आहे. या शेख गौसने अनवरबीचा खून करून त्यांच्या अंगावरील जवळपास 20 हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरले आहेत. आज त्याला कायदेशीर अटक झाली असून उर्वरीत कायदेशीर कार्यवाही उद्या न्यायालयात सुरू होईल असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *