नांदेड(प्रतिनिधी)-आज सकाळी असकूर ता.धर्माबाद येथे एका विहिरीत दगडाने बांधून फेकलेले प्रेत पाण्यावर आले आणि दीड महिन्यापुर्वी एका पित्याने आपल्याच मुलाचा खून करतांना दुसऱ्या मुलाची मदत घेतली होती असा भयंकर प्रकार समोर आला.
अतकूर ता.धर्माबाद गावात रमाकांत मोकले यांच्या विहिरीमध्ये आज सकाळी एक प्रेत तरंगतांना दिसले. या घटनेची माहिती धर्माबाद पोलीसांना देण्यात आली तेंव्हा धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरिक्षक संजय हिबारे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश कत्ते, पोलीस अंमलदार बालाजी नागमवाड आणि अनेक पोलीस विहिरीजवळ गेले. विहिरीत मेनकापडामध्ये गुंडाळलेले एक प्रेत शरीरावर अनेक ठिकाणी दगडांनी बांधून असतांना सुद्धा ते प्रेत पाण्यावर तरंगत होते. प्रेत बाहेर काढून पोलीसांनी त्याचा कायदेशीर पंचनामा केला आणि सर्व पोलीसांनी आपले कसब वापरून काही तासातच या खूनाचे रहस्य उघड केले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार मरणारा व्यक्ती मारोती चंद्रया दारमोड (28) असा आहे. दीड महिन्यापुर्वी मारोतीचे वडील चंद्रय्या गंगाधर दारमोड(50) आणि त्यांचा दुसरा मुलगा अनिल चंद्रय्या दारमोड (29) या दोघांनी मिळून मारोती दारमोडचा खून केला होता. त्याच्या प्रेताला मेनकापडमध्ये गुंडाळून आणि त्याचा मृतदेह दगडांनी बांधून रमाकांत मोकले यांच्या विहिरीत फेकून दिला होता. प्रेताला दगड बांधले असल्याने जवळपास दीड महिन्यानंतर हे प्रेत तरंगले आणि वर आले. अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील या प्रेताची ओळख पटली आहे. मयत मारोतीचे आजोबा गंगाधर दारमोड यांनी तक्रार दिली आहे की, मारोती हा काही काम धंदा करत नव्हता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याचे वडील चंद्रय्या दारमोड आणि भाऊ अनिल दारमोड यांनी त्याचा खून केला आहे. धर्माबाद पोलीस ठाण्यात वृत्तलिहिपर्यंत खून करणे, पुरावा नष्ट करणे या सदराखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्याकडे देण्यात येणार आहे.