नांदेड(प्रतिनिधी)-फक्त 48 तासात रिव्हाल्वर चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या पवन जगदिश बोरा (शर्मा) ला नांदेड जिल्हा महसुल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अत्यंत कमी कालावधीमध्ये शस्त्र परवाना मंजुर केला. तारखांमधील फरक पाहिला असतांना नांदेड जिल्हा प्रशासन किती गतीमान आहे याची प्रचिती येते. पण भेटलेल्या रिव्हाल्वरचा केलेला दुरुपयोग करणारा पवन बोरा सध्या तुरूंगात आहे.
पवन बोराने आपल्यासाठी शस्त्र परवाना मागतांना केलेल्या अर्जात आपला धंदा व्यापार लिहिलेला आहे. जमीनी खरेदी विक्री व्यवहार करणे यातून फक्त वर्षाला 1 लाख 80 हजार रुपये मिळतात असे महसुल विभागातील मंडळाधिकाऱ्यांनी लिहिलेल्या अहवालावरून दिसते.दि.5 नोव्हेंबर 2019 रोजी तत्कालीन पोलीस अधिक्षकांची स्वाक्षरी करतांना करीता हे शब्द लिहुन जिल्हा विशेष शाखेने चारित्र पडताळणी प्रमाणपत्र जारी करतांना भारतीय दंड संहितेतील कलम 307, 353, 392 सारख्या गुन्ह्यातून मुक्तता झाली असल्याचे लिहिले आहे. या चौकशीमध्ये शहर उपविभाग नांदेडच्या पोलीस उपअधिक्षकांनी व्यापार धंदा असल्याने पवन बोराला शस्त्राची गरज आहे असा अहवाल 19 डिसेंबर 2019 रोजी लिहिला आहे. तहसीलदार नांदेड यांनी लिहिलेल्या अहवालामध्ये पवन जगदीश बोरा हा व्यवसायीक व्यापारी आहे आणि तो माहिती अधिकारी संरक्षण समितीमध्ये महानगराध्यक्ष म्हणून काम करतो. त्याने अनेक लोकांविरुध्द माहिती मागवली म्हणून त्याला जिवीताचा धोका असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे अहवालात लिहिले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी सुध्दा त्याची वैद्यकीय तपासणी करून तो शस्त्र बाळगण्यास समर्थ असल्याचे प्रमाणपत्र 22 नोव्हेंबर 2019 रोजी दिले आहे.
पवन बोराने 3 ऑक्टोबर 2019 ते 5 ऑक्टोबर 2019 अशा 48 तासात शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा परवाना दि.7 नोव्हेंबर 2019 चा आहे. ही एवढी गतीमान प्रक्रिया नांदेड जिल्ह्यातील महसुल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी करून दिल्यानंतर पवन बोराला शस्त्र घेण्याची परवानगी मिळाली. त्याने 20 मार्च 2021 रोजी शस्त्र खरेदी केले. त्याचा क्रमांक 209117570 असा आहे. ज्या माणसाने शस्त्र चालवणे शिकवले. त्यानेच शस्त्र विक्री सुध्दा केली आहे. या बाबत नांदेडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी 4 मे 2020 रोजी या शस्त्र परवाना क्रमांक एन.डी./12/2020 ची नोंद वजिराबाद पोलीस ठाण्याने आपल्या अभिलेखात घ्यावी असा आदेश केला आहे.
नांदेड जिल्ह्याचा अत्यंत गतीमान महसुल प्रशासन आणि त्यापेक्षा थोडे जास्त गतीमान पोलीस प्रशासन यांनी पवन बोराला शस्त्र परवाना मंजुर करतांना दाखवलेली द्रुतगती सर्वसामान्य माणसाच्या कामात सुध्दा दाखवली तर देव त्यांचे किती भले करील.
48 तासात शस्त्र चालविणे शिकलेला पवन बोराला प्रशासनाने अत्यंत गतीमान पध्दतीने शस्त्रपरवाना दिला