पोलीस महासंचालक संजय पांडे यांची आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन भेट

पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची वेतन निश्चिती, थकबाकी व प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी डिसेंबर महिन्यात राज्यभर आयोजित होणार दरबार
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकाऱ्यांच्या व पोलीस अंमलदारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असंख्य पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या आज्ञांकित कक्षात येत आहेत. त्यासाठी डिसेंबर महिन्यात प्रत्येक पोलीस घटक प्रमुखाने या संदर्भाचा एक दरबार भरवून पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या अडचणी सोडवाव्यात असे पत्र पोलीस महासंचालकांच्यावतीने विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांनी राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांना पाठवले आहे.
राज्यातील पोलीस महासंचालक संजय पांडे यांची राज्याच्या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांमध्ये अत्यंत भारदस्त प्रतिमा आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी त्यांनी अनेक कल्याणकारी कामे केली आहेत. त्यासाठी आपली अडचण त्यांच्याकडे मांडण्यात सर्वांना रस आहे. पण पोलीस महासंचालक कार्यालयात आज्ञांकित कक्षात येणाऱ्या अधिकारी व अंमलदारांची संख्या जास्त असल्याने विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके यांनी एक पत्र निर्गमित केले आहे.
राज्यातील सर्व पोलीस आयुक्त सर्व पोलीस अधिक्षक यांच्यासह सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरिक्षक आणि परिक्षेत्रीय पोलीस उपमहानिरिक्षक यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. ज्यामध्ये आप-आपल्या घटकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या वेतन निश्चिती, थकबाकी आणि इतर प्रशासकीय समस्या जाणून घेण्यासाठी दरबार आयोजित करण्याचे सांगितले आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याबाबत या पत्रात उल्लेख आहे. आप-आपल्या घटकात दरबार आयोजित करून या समस्या पोलीस घटक प्रमुखांनी सोडवायच्या आहेत आणि तो दरबार याच महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये आयेाजित करायचा आहे. दरबारमध्ये झालेल्या सर्व कार्यवाहीचा अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयास पाठवायचा आहे.
पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचे राज्यातील घटकप्रमुख संजय पांडे यांनी आपल्या मातहतांसाठी घेतलेल्या भुमिकेबद्दल राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना आदर आहे. राज्यातील सर्व इतर पोलीस घटकप्रमुखांनी या महिन्यात दरबाराचे आयोजन करून पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या समस्या सोडवल्या तर संजय पांडे यांची ख्याती आणखीच वाढेल. पोलीस अधिकारी आणि अंमलदार या दरबाराकडे लक्ष लावून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *