रामप्रसाद खंडेलवाल
नांदेड -7 डिसेंबर रोजी रात्री गाडीपुरा परिसरात घडलेल्या नाट्याला दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जातीय स्वरुप आले आहे. सध्या जवळपास 15 जण पोलीसांच्या ताब्यात आहेत. अनेकांना पोलीस शोधणार आहेत आणि ते सुध्दा तुरूंगात जाणार आहेत. विचार करण्याची बाब आहे यातून मिळवले काय? याचे उत्तर जर नकारार्थक असेल तर हा प्रकार घडलाच का? याची कारणमिमांसा करणे अत्यंत गरजेचे आहे. नाही तर शांतताप्रिय नंदीग्राममध्ये हे वारे वाहिले तर त्यात जळणारी घरे आपलीच असतील याचे भान आम्हालाच ठेवायला हवे.
7 डिसेंबर रोजी घडलेला प्रकार आणि त्यानंतर दाखल झालेले दोन गुन्हे या प्रत्येक गुन्ह्यात दोन वेगवेगळ्या धर्माच्या 48 लोकांची नावे आहेत. दोन्ही गुन्ह्यांमध्ये जमावाची संख्या मोठी दाखवण्यात आली आहे. याचा अर्थ असा होतो की, जवळपास दोन खंडी लोक या गुन्ह्यात अडकले जाणार आहेत. एकमेकांवर दगडफेक, संपत्तीचे नुकसान, शारीरीक नुकसान या सर्व बाबी या घटनेमुळे फायद्याच्या रुपात प्राप्त झाल्या आहेत. आलेल्या संधीचे सोने करणारा व्यक्ती विद्वान मानला जातो. पण या प्रकारात आलेल्या संधीचे काय सोने झाले. याचा शोध घेणे आवश्यक आहे. कांही मिळणार असेल त्यासाठी काही गमवावे लागते हे ब्रिद आहे. पण या घटनेतून मिळवले कांहीच नाही. फक्त गमावले असेच चित्र उभे राहिले आहे. आमची घरे एक दुसऱ्याच्या भिंतीला जोडून आहेत. दुसऱ्याच्या घरात कोणाला खोकला आला तर तो खोकला सुध्दा आम्ही ऐकू शकतो अशा एका भिंतीच्या आड असणाऱ्या या घरामध्ये भांडण होण्याचा विषय कुठून आला हा मोठा प्रश्न आहे. ज्या भागात हा प्रकार घडला त्या भागातील मंडळी एक आवाज दिला तर 100 ओ भेटणारी आहेत. अशा परिस्थितीत आवाज देण्याची गरजच का आली याचा शोध महत्वपूर्ण आहे.
आता दोन गुन्हे दाखल झाले आहेत. दोन गुन्ह्यांमधील नावे असलेली 48 लोकांची मंडळी एकत्रितपणे तुरूंगात राहणार आहेत. कारण दोन्ही गुन्ह्यांमध्ये भारतीय दंड संहितेचे कलम 307 जोडलेले आहेत.कायदेशीर प्रक्रियेच्या जलदगतीचा विचार केला तरी कमीत कमी दोन-तीन महिने या लोकांना तुरूंगवास नक्कीच आहे. यावेळी आज असे दिसते आहे की, आमच्यावर हल्ला झाला असा वेगवेगळा आवाज उठू लागला आहे. आमच्यावर हल्ला झाला तेंव्हा त्यांनाही मार लागला याचा विचार कोण करील आणि तो विचार आम्ही केला नाही तर आम्हाला आमच्यावर हल्ला झाला असे म्हणण्याचा अधिकारच नाही. एक दुसऱ्याच्या विरुध्द निवेदने देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यावर काय कार्यवाही होणार हे ईतिहास पाहिला तरी त्याचे उत्तर मिळत नाही.
पुढे असे होईल की, दोन्ही गटांची मंडळी पोलीसांवर आरोप ठेवतील. त्यांना समोर आलेल्या कागदानुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. घडलेला प्रकार दोन जमातींमधला असल्यामुळे अत्यंत द्रुतगतीने कार्यवाही करणे त्यांचे कर्तव्य आहे. यात काही बोटावर मोजण्याऐवजी पोलीस मंडळी नक्कीच संधीचे सोने करणार आहे. मग त्यांना दोष देवून काय फायदा. संधी तर तुम्हीच दिली आणि त्यांनी सोने केले तर त्यांचे काय चुकले ? हा प्रश्न विचारला तर आमचे कुठे चुकले. भारताच्या संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वातंत्र्य दिलेले आहे. स्वातंत्र्यांचा उपयोग स्वैराचार म्हणून करता कामा नये. त्यासाठीच तर कायदा आहे. भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा, सुधारीत गुन्हेगारी कायदा यांच्या कलमातील व्याख्यांचा विचार केला तर ते न समजण्याइतपत अपघड आहेत.
या घटनेतील मंडळी जेंव्हा तुरूंगात जातील तेथे तर असंख्य कायदे पंडीत बसलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेतील आणि पुन्हा बाहेर आल्यावर याच मार्गावर चालतील आपल्या जीवनासाठी काय आवश्यक आहे यापेक्षा त्यांना या चुकीचे काम करण्यामध्ये जास्त रस निर्माण होईल आणि समाजाची शांतता कायम अशीच अर्धवट राहिल. मुळात ज्या घरात ही मंडळी जन्म घेतलेली आहे त्या घरच्या मंडळीतील वरिष्ठ लोकांनी आपल्या घरातील अशा मंडळींना दिलेले संस्कार कोठे तरी नक्कीच चुकले आहेत. आणि म्हणूनच हा 7 डिसेंबरचा प्रकार घडला. यापुढे तरी आपल्या शहरात आपल्यामुळे अशांतता माजणार नाही याची शपथ आपण घेतली पाहिजे तरच भारतीय संविधानाने दिलेल्या आपल्या अधिकारांना आपण जीवंत ठेवू शकणार आहोत.
7 डिसेंबरला घडलेल्या दंगलीचा जबाबदार कोण?