बालिकेच्या टी.सी.मध्ये खाडाखोड करण्यात आली
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथून पळून गेलेल्या एका 13 वर्षीय बालिकेसंदर्भाने गुन्ह्याच्या तपासात पोलीसांनी केलेल्या प्रगतीनुसार नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बालिकेला पळवून नेणाऱ्या युवकाला न्यायालयाने 13 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. आपल्या बालिकेच्या टी.सी.वर खाडाखोड करून तिच्या वडीलांनी तिचा बालविवाह सुध्दा लावलेला आहे. ही बालिका अनुसूचित जातीची आहे.
17 नोव्हेंबर 2021 रोजी माझी बालिका 17 वर्षाची घरी नाही अशी तक्रार तिच्या वडीलाने वजिराबाद पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 418/2021 कलम 366(अ) नुसार दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. या बालिकेला महेश शिवाजी गंजे (20) हा युवक बोलतांना त्या बालिकेच्या मैत्रीणींनी पाहिले होते. या एकाच आधारावर पोलीसांचा तपास पुढे जात असतांना सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया वजिराबाद पोलीसांनी केली आणि नवीन धक्कादायक घटनाक्रम समोर आला.
महेश शिवाजी गंजे याने या बालिकेला पळवून नेले होते. तो तिला घेवून मुंबईला गेला होता आणि पैसे संपल्यामुळे परत आला आणि पुन्हा पैसे जमवून पळून जाणार होता. दरम्यान पोलीसांनी केलेल्या तपासात पुढे आलेल्या घटनाक्रमानुसार बालिकेच्या टी.सी.वर खरी जन्म तारीख 7-4-2008 असतांना तिला खाडाखोड करून ती तारीख 7-4-2004 अशी करण्यात आली होती. टी.सी.वर जन्म तारीख अक्षरात पण लिहिलेली असते ती मात्र बरोबर होती. यावरून पोलीसांनी मुळ टी.सी.हस्तगत केली असतांना त्या टी.सी.वर बालिकेची खरी जन्म तारीख 7-4-2008 अशी आहे. यावरून या गुन्हा क्रमांक 418 मध्ये भारतीय दंड संहितेचे कलम 376(2)(एन) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 ची वाढ झाली. पोलीसांनी या आपल्या प्रगतीनुसार 9 डिसेंबर रोजी अल्पवयीन बालिकेला पळवणाऱ्या महेश शिवाजी गंजे यास पकडले. न्यायालयाने त्याला 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शाळेतील अभिलेखाप्रमाणे ही अल्पवयीन बालिका अनुसूचित जातीची आहे. त्यामुळे आता शाळेचा निर्गमउतारा पोलीस हस्तगत करतील आणि त्यानुसार पुढे याच गुन्ह्यात ऍट्रॉसिटी कायद्याची कलमे सुध्दा वाढतील. पोलीसांनी प्राप्त केलेल्या माहितीनुसार टी.सी.वर खाडाखोड करून त्या बालिकेच्या वडीलांनी तिचे लग्न लावून दिलेले आहे. हा एक वेगळा गुन्हा या प्रकरणात घडला आहे. कायद्याचे अज्ञान आणि सुसंस्कृत विचारश्रेणीचा अभाव यामुळेच हा प्रकार घडला आहे असे म्हणावे लागेल.
अनुसूचित जातीच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेणारा युवक पोलीस कोठडीत