नांदेड(प्रतिनिधी)-एनआयएने पकडलेल्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील एक तुरूंगात असलेला बंदी काल मरण पावला आहे. त्याबाबत वजिराबाद पोलीसांनी आकस्मात मृत्यू दाखल केला आहे. यापुर्वी सुध्दा एक बंदी मरण पावला होता. त्यात बंदीच्या पत्नीने कारागृह अधिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला अशी तक्रार दिली आहे. त्या संदर्भाने सुध्दा आकस्मात मृत्यू दाखल आहे.
मागील महिन्यात एनआयए शाखा मुंबईने नांदेडमध्ये डॉ.शंकरराव चव्हाण चौकाजवळ एका व्यापारी संकुलात अंमलीपदार्थ या व्याख्येत येणारे अफुबोंडे (डोडे) आणि अफीम पकडली होती. त्यात एकूण 4 जणांना गुन्हा क्रमांक 99/21 मध्ये अटक झाली होती. तीन जणांना न्यायालयाने 26 नोव्हेंबर रोजी तुरूंगात पाठवले होते. या तिघांमध्ये एकाचे नाव जितेंद्रसिंघ परगणसिंघ भुल्लर असे होते.जितेंद्रसिंघ हा बंदी क्रमांक 2292/2021 नुसार नांदेडच्या तुरूंगात राहत होता. दि.9 डिसेंबर रोजी दुपारी त्याच्या सोबतच्या इतर बंद्यांनी त्याला आवाज दिला असता त्याने प्रतिसाद दिला नाही म्हणून इतर बंद्यांनी तेथील सुरक्षा रक्षकांना बोलावले आणि जितेंद्रसिंघला उपचारासाठी सरकारी रुग्णालय विष्णुपूरी येथे दाखल केले. पण उपचारादरम्यान रात्री 10 वाजता जितेंद्रसिंघचा मृत्यू झाला. प्रभारी कारागृह अधिक्षक माधव कामाजी खैरगे यांनी दिलेल्या अर्जानुसार मरण पावलेल्या जितेंद्रसिंघ भुल्लर याचा इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन व्हिडीओद्वारे करावे आणि त्याचा अहवाल तुरूंगाला सादर करावा.
या अर्जानुसार आज दि.10 डिसेंबर रोजी वजिराबाद पोलीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 64/2021 दाखल केला आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव अधिक तपास करीत आहेत.
कांही महिन्यापुर्वी असाच एक बंदी क्रमांक 1229/2021 हा 17 जून 2021 रोजी तुरूंगात मरण पावला होता. त्याबाबत सुध्दा आकस्मात मृत्यू क्रमांक 32/2021 दाखल असून या प्रकरणामध्ये मयत बंदी भिमराव यादवराव वाघमारे यांची पत्नी सुनिता वाघमारे यांनी अर्ज दिलेला आहे की, माझ्या नवऱ्याचा मृत्यू कारागृह अधिक्षक आणि कारागृहातील कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. त्यांच्याविरुध्द कार्यवाही व्हावी. वजिराबाद पोलीस याही आकस्मात मृत्यूचा तपास करत आहेत.
एनआयएने पकडलेल्या आरोपींपैकी एकाचा मृत्यू ;कारागृहाने दाखल केलेली आकस्मात मृत्यू