नांदेड खांडल विप्र शाखा सभेत लोकशाहीला काळीमा फासत निवडणुक

नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाही प्रक्रियेला काळीमा फासत नांदेड खांडल शाखा सभेने अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली. कोणत्याही नियमावलीशिवाय सुरू झालेल्या या प्रक्रियबद्दल अध्यक्षपदाच्या एका उमेदवाराने निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवून निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार केला.
लोकशाहीमध्ये निवडणुक प्रक्रिया ही एक सहज आणि सर्वांच्या हिशोबाची असते. खांडल विप्र शाखा सभा नांदेड यातील माजी अध्यक्ष प्रेमराज विष्णुदास शर्मा हे आहेत. मागील सहा वर्षापासून तेच अध्यक्ष आहेत. निवडणुक प्रक्रिया जाहीर करतांना अगोदर त्याची नियमावलीनुसार जाहिरीकरण होणे आवश्यक आहे. तरीपण एका व्हॉटसऍपग्रुपवर सहमतीने अध्यक्षपदाची निवडणुक लढवू असे संदेश पाठवून आज दि.10 डिसेंबर रोजी त्यासाठी नांदेड शहरातील मारवाडी धर्मशाळा येथे सभा बोलावली. सभेमध्ये माजी अध्यक्ष प्रेमराज शर्माने मीच पुढचा अध्यक्ष होणार असे जाहीर केले. त्यावर गोपीकिशन शर्मा यांनी मला सुध्दा अध्यक्ष व्हायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. या सभेत जवळपास 70 खांडल विप्र सदस्य हजर होते.
निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार आल्यानंतर त्याच वेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून राधेशाम शर्मा यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी प्रत्येकाला एक चिठ्ठी दिली आणि मतदान गुप्त होईल असे सांगितले. पण चिठ्या मिळताच प्रेमराज शर्मा यांच्या गटाच्या सदस्यांनी आपल्या उमेदवाराचे नाव आपल्या आणि इतरांच्या चिठ्यांवर अगोदरच लिहुन घेतले. त्यानंतर ज्या चिठ्ठीवर नाव लिहिले आहे ती चिठ्ठी बाद ठरेल असा आक्षेप गोपीकिशन शर्मा यांनी उपस्थित केला. अगोदर पासूनच कट रचून या निवडणुकीची तयारी केलेल्या प्रेमराज शर्मा गटाने आपल्या पध्दतीने मतदान प्रक्रिया सुरू केली. त्यावर गोपीकिशन शर्मा यांनी आक्षेप घेत लेखी अर्ज दिला आणि मतदान प्रक्रिया लोकशाहीला मारक ठरणारी आहे. म्हणून ती रद्द करावी अशी मागणी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. त्यावेळी मतदानापुर्वी एकच निवडणुक निर्णय अधिकारी होता पण गोपीकिशन शर्मा यांनी दिलेल्या आक्षेप अर्जावर राधेशाम शर्मासह रामानंद बन्सा यांनी सुध्दा निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून स्वाक्षरी केली.
यानंतर हा आक्षेप देवून गोपीकिशन शर्मा आणि त्यांचा गट निवडणुक सोडून बाहेर आला आहे. भारतीय लोकशाहीत निवडणुक ही एक मोठी, सुंदर आणि आपला उमेदवार निवडण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला काळीमा फासत खांडल विप्र शाखा सभा नांदेडने घेतलेल्या या निवडणुकीबद्दल आता पुढे कायदेशीर मार्ग चाचपण्याची तयारी गोपीकिशन शर्मा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *