नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या सिडको भागातील वसुली लिपीकाने अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही न करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 10 हजार रुपये लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास जेरबंद केले आहे.
9 डिसेंबर रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या घराच्या अनाधिकृत बांधकामावर मनपाच्या मार्फत कार्यवाही करून घर पाडण्याची परिस्थिती येवू नये म्हणून वसुली लिपीक 15 हजार रुपयांची लाच मागणी करीत आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 10 डिसेंबर रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. तेंव्हा तडजोडीनंतर वसुल लिपीक व्यंकट विठ्ठलराव गायकवाड (37) वर्ष मुळ नियुक्ती शिपाई अतिरिक्त पदभार वसुली लिपीक महानगरपालिका नांदेड क्षेत्रीय कार्यालय सिडको यांनी 10 हजार रुपयांची लाच स्विकारली आणि त्यास जेरबंद करण्यात आले.लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुळात शिपाई आणि अतिरिक्त कार्यभार असलेल्या वसुली लिपीकावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1188 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सुरू केली आहे.
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंह चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलीस अंमलदार एकनाथ गंगातीर, जगन्नाथ अनंतवार, ईश्र्वर जाधव, शेख मुजीब यांनी पार पाडली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-25351, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल नंबर 7350197197 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.
महानगरपालिकेचा वसुली लिपीक अडकला 10 हजारांच्या लाच जाळ्यात