पुढील सुनावणी 9 फेबु्रवारी रोजी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील मुजरांची असलेली एनटीसी मिल (नॅशनल टेक्सटाईल्स कार्पोरेशन) या संस्थेला दिलेली जमीन नांदेड गुरुद्वारा बोर्डाने दिलेली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये या जमीनीची लिज पुर्ण होणार आहे. त्यासाठी ही जमीन पुन्हा गुरूद्वारा बोर्डाला मिळावी अशी एक रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे.
न्यायमुर्ती एस.जी. दिघे आणि न्यायुमर्ती एस.व्ही. गंगापुरवाला यांनी या प्रकरणात प्रतिवादींना नोटीस काढली असून त्याची पुढील सुनावणी 9 फेबु्रवारी 2022 रोजी निश्चित केलेली आहे. या रिट याचिकेमध्ये अध्यक्ष गुरूद्वारा बोर्ड आणि अधिक्षक गुरूद्वारा बोर्ड यांच्यावतीने सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. या रिट याचिकेत भारत सरकार, नॅशन टेक्सटाईल्स कॉर्पोरेशन, नांदेड टेक्सटाईल्स मिल आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
या याचिकेतील मागणीनुसार 5 ऑक्टोबर 1922 रोजी एनटीसी मिलला 600 रुपये प्रति महिना या रक्कमेवर 84 एकर 17 गुंठे जमीन लिजवर दिलेली आहे. त्यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक दलिपसिंघ रामसिंघ हे होते. त्यावेळी एनटीसीचे व्यवस्थापक फजिल तहवर हे होते.हा लिज करार 5 ऑक्टोबर 1922 रोजी झालेला आहे. न्यायालयात सादरीकरण करतांना या रिटयाचिकेचे वकील ऍड. जी.ए.गाडे यांनी या जमीनीवर जवळपास 44 एकर जागेवर अतिक्रमण झालेले आहे. उर्वरीत जागा अर्थात 40 एकर 17 गुंठे ही एनटीसीच्या ताब्यात आहे आता लिज संपत आहे. या लिज प्रमाणे दिलेली 84 एकर 17 गुंठे जागा अतिक्रमण काढून सचखंड गुरूद्वारा बोर्डाला परत द्यावी अशी मागणी रिट याचिका क्रमांक 13611/2021 मध्ये करण्यात आली आहे.
न्यायमुर्तींनी यावर 8 डिसेंबर रोजी चारही प्रतिवादींना नोटीस जारी केल्या असून त्याची पुढील सुनावणी 9 फेबु्रवारी 2022 रोजी सुनिश्चित करण्यात आली आहे.
एनटीसीची लिज संपत आहे जागा परत मिळण्यासाठी गुरूद्वारा बोर्डाची याचिका