नांदेड(प्रतिनिधी)-एक बिल्डींग मटेरीयल सप्लायर विरुध्द आरटीआय कार्यकर्ता आणि भ्रष्टाचार निर्मुल समितीचा अध्यक्ष खंडणी घेत असतांना सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण, वजिराबादचे दोन पोलीस अंमलदार आणि भाग्यनगरचे दोन पोलीस अंमलदार अशा पथकाने आरटीआय कार्यकर्ता आणि भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या अध्यक्ष विलास पांडुरंग घोरबांड पाटील यास आज 50 हजारांची खंडणी घेतांना रंगेहात पकडले आहे. ही सर्व कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनात झाली आहे.विलास घोरबांड पाटीलने कोणत्याही नागरीकास खंडणी मागितली असेल, धमकावले असेल, कोणत्याही कारणास्तव कोणाला त्रास दिला असेल तर त्या नागरीकांनी पोलीसांकडे तक्रार करावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
विकासनगर कौठा येथे राहणारे बिल्डींग मटेरियल सप्लायर विकास मोहनराव आढाव (36) यांनी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्याकडे तक्रार दिली की, माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ता विलास पुंडलिंक घोरबांड पाटील (33) वर्ष रा.कलंबर ता.लोहा याने विकास आढाव विरुध्द तहसील कार्यालयात तक्रार दिली की, त्यांनी खोदलेले गौण खनीज मुरूम याची मोजणी व्हावी. त्याप्रमाणे त्या खदानीची ईटीएस मोजणी झाली. त्यानंतर विलास घोरबांड मागील चार ते पाच महिन्यांपासुन तहसील कार्यालयात दिलेला अर्ज परत घेण्यासाठी विकास आढावकडे 1 लाख रुपये खंडणीची मागणी करीत होता. विकास आढावने विलास घोरबांड पाटलांना सांगितले की, माझे मुरूम खोदणीचे काम कायदेशीर आहे. तेंव्हा विलास घोरबांड पाटलांनी मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. आणि भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष आहे. माहिती अधिकाराखाली तुमच्याविरुध्द दुसरा अर्ज देवून माहिती मागवतो असे म्हणून खोटे नाट्य अर्ज करून विकास मोहनराव आढाव यांच्या कामात व्यत्यय आणणे सुरू केले. त्रास जास्त होत आहे, त्या त्रासामुळे व्यवसाय कठीण झाला म्हणून विकास मोहनराव आढाव यांनी आपली तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली.
ही कार्यवाही प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रमोदकुमार शेवाळे यांनी बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण, वजिराबादचे पोलीस अंमलदार व्यंकट गंगुलवार, जाधव, भाग्यनगरचे कदम,विलास राठोड यांना विकास आढाव सोबत पाठवले. तत्पुर्वी 1 लाख रुपये खंडणीमधील पहिला हप्ता आज 50 हजार रुपये आणि उर्वरीत 50 हजारांचा दुसरा हप्ता एक ते दीड महिन्यात देण्याचे ठरलेले होते. आज दि.14 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 2.30 वाजेदरम्यान डॉ.आंबेडकर चौक, लातूर फाटा येथे विकास मोहनराव आढावकडून आरटीआय कार्यकर्ता आणि भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष विलास पुंडलिक घोरबांड पाटील यांना अर्चित चांडक यांच्या पथकाने पंचांसमक्ष 50 हजारांचा खंडणीचा पहिला हप्ता घेतांना ताब्यात घेतले.
पोलीसांनी नागरीकांना आवाहन केले आहे की, विलास पुंडलिक घोरबांड पाटील यांनी कोणत्याही नागरीकाला खंडणी मागितली असेल, धमकावले असेल, कोणत्याही कारणास्तव कोणालाही त्रास दिला असेल तर त्या नागरीकांनी पोलीसांकडे तक्रार करावी.
शासन जे काम करते त्या कामातील शिर्षके वापरण्यास बंदी आहे. उदाहरणार्थ माहिती अधिकार हा कायदा आहे. तसेच भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. पण आपल्या संस्थेत माहिती अधिकार, भ्रष्टाचार निर्मुलन अशी नावे जोडून या नावाखाली सुरू असलेला सैराट प्रकार बंद व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय आयुक्त एस.जी. डींगे यांनी 4 जुलै 2018 रोजी सुधारीत परिपत्रक क्रमांक 543 जारी केले होते. भ्रष्टाचार निर्मुलन माहिती अधिकार, मानवाधिकार हे कुठल्याही संस्थेचे उद्देश असू शकत नाहीत असे या परिपत्रकात लिहिले आहे. राज्यातील सर्व धर्मदाय सहआयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना पाठवलेल्या या परिपत्रकात संबंधीत व्यक्तींना असे शब्द बदलण्यासाठी सांगावे असे लिहिलेले आहे. जर त्या संस्थांच्या विश्र्वस्थांनी ऐकण्यास नकार दिला तर त्यांच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक विश्र्वस्त व्यवस्था कायद्यान्वये योग्यती कार्यवाही करावी असे सुचित केलेले आहे. पण आजपर्यंत असे प्रतिबंधीत नाव वापरणे सुरूच आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केलेल्या या कार्यवाहीची नक्कीच प्रशंसा केली पाहिजे.