नांदेड(प्रतिनिधी)- भोकर येथील मनजित कॉटन या कंपनीचे 50 लाख रुपये घेवून जाणाऱ्या चार चाकी वाहनातून चोरट्यांनी अत्यंत नियोजनबध्दरितीने ती 50 लाखांची बॅग लंपास केली आहे. घडलेला प्रकार आणि त्याच्या चर्चा वेगवेगळ्या सुरू आहेत. पण या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज पाहिला असता चोरट्यासाठी चार चाकी वाहनाची खिडकी उघडीच ठेवण्यात आलेली होती.

भोकर येथील प्रसिध्द मनजित कॉटन या कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.के.7648 यामध्ये एचडीएफसी बॅंकेतून 50 लाख रुपये काढून या कंपनीचा चालक ही गाडी घेवून बाफना टी पॉईंट येथे आला. तो त्या ठिकाणी गाडी उभी करून खाली उतरला गाडीच्या डाव्याबाजूची मागील खिडकी उघडी होती. त्या ठिकाणी थांबलेला एक माणुस त्या खिडकीजवळ गेला आणि त्याने तेथून ती बॅग बाहेर काढली. त्यानंतर हा माणुस गाडीच्या पुढे आला. त्याच्यासाठी त्या चार चाकी गाडी मागून एक दुचाकी स्वार आला आणि त्याला त्याlला गाडीवर बसवले. गाडीवर बसतात 50 लाखांची बॅग पकडून बसलेला चोरटा दुचाकीवरुन खाली सुध्दा पडला. पण उजवीकडेच गेलेल्या त्या गाडीच्या ड्रायव्हरला मात्र हा प्रकार कळला नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे, जगदीश भंडरवार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी पोहचले. याबाबत आसपास असलेले सीसीटीव्ही फुटेज, ज्या एचडीएफसी बॅंकेतून पैसे काढले तेथील सीसीटीव्ही फुटेज, ज्या रस्त्याने चार चाकी वाहन बाफना टी पॉईंटपर्यंत आले त्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. याबाबत वृत्तलिहिपर्यंत कोणत्याही गुन्हाची नोंद झाली नव्हती. घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक असून अत्यंत नियोजित पध्दतीने केलेली ही 50 लाखांची चोरी उघड करणे पोलीसांसमोरचे आवाहन आहे.
