नांदेड(प्रतिनिधी)- 50 हजारांची खंडणी घेतल्यानंतर विलास पुंडलिकराव घोरबांड पाटील यांची बिघडलेली प्रकृती 48 तासात बरी झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दवाखान्यातून सुट्टी दिली आणि त्यानंतर गुन्ह्याचे तपासीक अंमलदार, नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांनी विलास पाटील यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया उद्या दि.17 डिसेंबर रोजी न्यालयापासून सुरू होणार आहे.
दि.14 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास डॉ. आंबेडकर चौक, लातूर फाटा जवळील रत्नेश्र्वरी गॅरेजमध्ये बसून आरटीआय कार्यकर्ता तथा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष विलास पुंडलिकराव घोरबांड पाटील याने विकास मोहनराव आढाव पाटील यांच्याकडून 50 हजार रुपये खंडणी पंचासमक्ष स्विकारली. हा प्रकार सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या पथकाने विलास पाटीलला ताब्यात घेऊन पुर्ण केला. त्यानंतर विलास घोरबांड पाटील यांची प्रकृती बिघडली तेंव्हा त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात विकास मोहनराव आढाव यांच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 384 नुसार गुन्हा क्रमांक 872/2021 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांना देण्यात आले.
दि.15 डिसेंबर रोजी अभिषेक शिंदे यांनी या गुन्ह्याची कागदपत्रे स्विकारली. आज दि.16 डिसेंबर रोजी ते पुन्हा नांदेडला आले आणि त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विलास पुंडलिकराव घोरबांड पाटील यांना दवाखान्यातून मुक्त केले. आज दि.16 डिसेंबर रोजी विलास घोरबांड पाटील यांना गुन्हा क्रमांक 872 मध्ये अटक करण्यात आली आहे. या पुढील कायदेशीर प्रक्रिया उद्या दि.17 डिसेंबर रोजी न्यायालयातून पुढे सुरू होणार आहे.