नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तयार होणारी टोलेजंग इमारत अनेक कारणांनी नेहमीच चर्चेत राहिली. काल दि.15 डिसेंबर रोजी या इमारतीत सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अपघात झाला. या अपघातात कांही मजुर मंडळी जखमी झाली आहे. पण पोलीस ठाणे वजिराबाद येथे माहिती विचारली असता याबाबत कोणीच तक्रार केलेली नाही असे सांगण्यात आले. मोठ-मोठी मंडळी या इमारतीची मालक असतांना होणार तरी काय ? आणि त्यातही मजुरांच्या जखमेची त्यांच्यासाठी किंमत काय? हा प्रश्न समोर आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेली एक जुनी वस्ती एका गडगंज श्रीमंताने तीन चार भागिदारांसह मिळून खरेदी केली. त्यावेळी त्या वस्तीमध्ये असणाऱ्या अनेक लोकांची घरे रिकामी करतांना काहींचे सेटलमेंट, कांहीचे बळजबरी असा प्रयोग करण्यात आला. अनेक लोकांविरुध्द खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठविण्यात आले. त्यानंतर या भुखंडात अभिलेखावर असलेल्या जमीनीपेक्षा जास्ती जमीन ताब्यात घेतली. याबद्दल कांही लोकांनी न्यायालयीन प्रक्रियेनुसार कार्यवाही केली. पण न्यायालयीन प्रक्रियेला ठेंगा दाखवून या भुखंडावर आता टोलेजंग इमारत बांधली जात आहे. या इमारती शेजारी असलेल्या दुसऱ्या इमारतीतील लोकांना त्रास होईल. त्यांच्या भौतिक सुविधांवर गदा येईल असे वर्तन करुन ही इमारत बांधण्याचे काम सुरु आहे. कांही मंडळींनी भुखंडांचे जुने अभिलेख शोधून काढले. त्या आधारावर आजही न्यायालयात या तयार होणाऱ्या इमारतीच्या भुखंडाबाबत वाद सुरू आहे.
काल दि.15 डिसेंबर रोजी सुर्यास्त होण्याच्या काहीवेळ अगोदर या इमारतीचे तयार होणारे छत कोसळले. या दुर्घटनेमुळे कांही मजुर जखमी झाले. त्यातील आपल्या जखमेने ओरडणाऱ्या मजुरांचा आवाज सुध्दा एका व्हिडीओमध्ये ऐकू येतो. या दुर्घटनेची माहिती वजिराबाद पोलीसांना सुध्दा मिळाली. तेंव्हा पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी स्वत: त्या जागी जावून पाहणी केली आणि त्या संदर्भाची नोंद आपल्या डायरीमध्ये घेतली. आज दि.16 डिसेंबर रोजी पोलीस ठाणे वजिराबाद येथे विचारणा केली असता या संदर्भाने अद्याप कांही तक्रार आलेली नाही असे सांगण्यात आले. श्रीमंत मंडळीकडे मजुरांच्या जखमांची किंमत काय असेल हे या प्रकरणावरुन दिसत आहे. आज जरी मजुरांवर उपचार केले जात असतील तरी पण पुढे कांही दुर्घटना घडली तर त्यासाठी लागणारा कायदेशीर अभिलेख कोठे तयार झाला. मजुरांकडून काम करून घेत असतांना त्यांच्या सुरक्षेची दक्षता घेणे ही जबाबदारी काम घेणाऱ्या मालकांवर असते. बांधकाम करतांना त्यासाठी एक एसओपी निश्चित आहे. पण त्या एसओपीशिवाय हे काम सुरू असल्याने ही दुर्घटना घडली आहे.