जीवघेणा हल्ला करणाऱ्याला सात वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रोख दंड

नांदेड,(प्रतिनिधी)-जीवघेणा हल्ला करणाऱ्याला  नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी सात वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या दंडाच्या रक्कमेतील १५ हजार रुपये प्रकरणातील जखमी व्यक्तीला देण्यास सांगितले आहे.

दि.२९ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी शंकर किशन जिंदम, रमेश नारायण गरुडकर, दिपक अशोकराव हसनपल्ली हे तिघे मित्र एका गाडीवर जात असताना इतवारा भागातील पहेलवान टी हाऊस जवळ भुऱ्या उर्फ सुदाम जोंधळे (२१) रा.प्रितीनगर इतवारा याने या तिघांची दुचाकी गाडी क्र.एमएच-२७-क्यू-६५४८ अडवली आणि शंकर किशन जिंदमला तु मला काल दि.२८ ऑगस्ट २०१६ रोजी शिव्या देत होतास असे सांगत आपल्याकडील धारदार हत्याराने शंकर किशन जिंदमच्या पोटात वार केले. या घटनेनंतर शंकरचे मित्र रमेश आणि दिपक यांनी जखमी शंकरला ऑटोरिक्षात घालून शासकीय रुग्णालय विष्णूपुरी येथे उपचारासाठी नेले. जखमी अवस्थेत शंकर किशन जिंदम यांनी दिलेल्या जबाबानुसार २८ ऑगस्ट रोजी  भुऱ्या उर्फ  सुदाम दिनाजी जोंधळेने त्यास दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यावर  भुऱ्या जोंधळेने त्याचे खिसे तपासले होते. पण पैसे नव्हतेच म्हणून दिले नाहीत आणि २९ ऑगस्ट रोजी माझ्यावर जिवघेणा हल्ला केला.
इतवारा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र.११५/२०१६ कलम ३०७, ३४१ नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.डी.आव्हाड यांनी केला होता. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर दहा साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालय समक्ष नोंदविले. या प्रकरणात आलेला पुरावा ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी  भुऱ्या उर्फ  सुदाम दिनाजी जोंधळेला  सात वर्ष सक्तमजुरी, वीस हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या रक्कमेतील पंधरा हजार रुपये जखमी शंकर किशन जिंदम यास देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.बी.एम.हाके यांनी सरकार पक्षाची बाजू सादर केली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड.इद्रिस कादरी यांनी काम केले. इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गौतम कांबळे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भूमिका वठवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *