
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील मुरमुरा गल्लीत एका 30 वर्षीय युवकाचा छातीत चाकु खूपसून खून केल्याचा प्रकार अत्यंत गर्दीच्या ठिकाणी घडला. कोणीच मारेकऱ्याला रोखले नाही हा प्रकार या जगातील दुर्देवी घटनाक्रम आहे.
दुपारी 11 ते 12 वाजेदरम्यान शहरातील मुरमुरागल्ली भागातील राधे गोविंद ट्रेडींग कंपनी आणि श्री सेवा ट्रेडींग कंपनी या दोन दुकाना समोरच्या रस्त्यावर लखन उत्तम जाधव (30) रा.देवापुर ता.मुदखेड या युवकाच्या छातीत खंजीर खुपसवून दुसऱ्या युवकाने खून केला. मुरमुरागल्लीत खून केलेला चाकु पण पडलेला आहे. मुरमुरागल्लीत नेहमीच गर्दी असते. एवढ्या गर्दीत एका युवकाचा दुसरा युवक हल्ला करतो, सर्वांसमक्ष त्याचा खून करतो ही घटना भारतातील विचारांचा दुर्देवी प्रकार आहे. प्रकरण कांहीही असेल 100 ते 200 लोकांसमोर एक युवक खून करतो अशावेळी ते 100 ते 200 एकत्रितपणे ओरडले असते तरीपण हल्लेखोराची खून करण्याची हिंमत झाली नसती. सर्वांसमक्ष खून करून खून केलेला चाकू तेथेच टाकून मारेकरी निघून गेला. त्या ठिकाणी मयत युवकाचे आधारकार्ड सुध्दा पोलीसांना सा पडले आहे.
घटनेची माहिती मिळताच वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस अंमलदार अजय यादव, साहेबराव आडे, प्रकाश राठोड, अंकुश पवार,बाबूराव डवरे, बबन बेडदे यांच्यासह अनेकजण येथे पोहचले. घडलेल्या घटनेची सर्व माहिती घेवून पोलीसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
अत्यंत गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या खूनाचे कारण अद्याप कळलेले नाही. पण भरदिवसा, उन्हाच्यावेळेस, गर्दीच्या ठिकाणी असा सहज खून घडावा हे मात्र नक्कीच दुर्देवी आहे. पोलीस आता याप्रकरणाचे पुरावे जमा करतील तेंव्हा खऱ्या अर्थाने ज्यांनी हा खून पाहिलेला आहे. त्यांनी स्वत: आपले जबाब पोलीसांसमक्ष नोंदवले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत नेता येईल.