हिमायतनगर/नांदेड ,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात ओमीक्रॉंनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हे सर्वजण दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर शहरात आलेले असल्या कारणाने त्यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या तिघांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आता ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी त्यांचे अहवाल पुण्याला पाठविण्यात आले आहेत.
हिमायतनगर शहर हे विदर्भ- तेलंगणाच्या सीमेवरील मध्यभागी असून, तालुक्याचे ठिकाण आहे, येथील बाजारपेठ मोठी असल्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून येथे नागरिक, खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी येतात. देशात व राज्यातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविड तपासणी अनिवार्य करण्यात आली. लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमायक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात ओमायक्रॉनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर शहरात आलेले हे तीन जण ओमायक्रॉन संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. या तिन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, सध्या या तिन्ही रुग्णांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राप्त माहितीनुसार हे तिघेजण हिमायतनगर येथे त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. पाच दिवसापूर्वी ते हिमायतनगरला आल्यानंतर त्यांची दोन दिवसापूर्वी कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्यासोबतच्या व संपर्कात आलेल्या पाच नातेवाईकांचेही स्वॅब घेण्यात आले असून, ते आणखी कुणाकुणाच्या संपर्कात होते याची माहिती घेवून त्यानुसार चौकशी सुरु आहे.
दरम्यान, पुणे येथील आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच या रुग्णांना ओमीकॉनची लागण झाली का नाही ते स्पष्ट होणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा फैलाव मोठया प्रमाणात असल्याने आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काही संशय वाटल्यास तपासणी करून घ्यावी आणि लसीकरण करून घ्यावे आवाहन केले आहे.
दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले की, या तिन्ही रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून, ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी त्यांचे अहवाल पुण्याला पाठविण्यात आले आहेत. तो अहवाल आल्यानंतर अंतिम निष्कर्ष काढण्यात येईल. नागरिकांनी सध्या तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. नांदेड जिल्ह्यात गेल्या वीस दिवसात ३०२ विदेशी नागरिक दाखल झाले असून, त्यांच्या सर्वांची चाचणी करण्यात आली आहे व त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
तीन संशयित ओमायक्रोन रुग्ण सापडलेत