नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला एक जबरी चोरीचा प्रकार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने उघडकीस आणला असून तीन जणांनी मिळून हा जबरी चोरीचा प्रकार घडविला होता. त्यातील दोन जण सध्या तुरूंगात आहेत आणि एकाला स्थानिक गुन्हा शाखेने नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार भानुदास वडजे, संजय केंद्रे, तानाजी येळगे असे पोलीस पथक आज दुपारी गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, 21 ऑगस्ट रोजी रात्री दुध विकून घरी जाणाऱ्या व्यक्तीची लूट झाली होती. त्याबद्दलचा गुन्हा क्र. 597/2021 नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होता. त्या गुन्ह्यातील एक आरोपी वाजेगावला आहे, या माहितीवर पोलीस पथक वाजेगावला गेले. तेथे त्यांनी शेख जुबेर उर्फ जे.डी. शेख कदीर (18) या युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती विचारली असता त्याने 21 ऑगस्ट रोजी केलेला जबरी चोरीचा गुन्हा मान्य केला. मारहाण करून आणि चाकू दाखवून बोंढार बायपासजवळ एका व्यक्तीकडून 34 हजार 500 रूपये रोख रक्कम आणि त्याचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला होता. चोरट्याने त्यावेळी स्वत: वापरलेली दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 बी.पी. 7596 ही जागीच सोडून पळून गेले होते.
त्यादिवशी, 21 ऑगस्ट रोजी माझ्यासोबत शेख इस्माईल उर्फ चोली शेख महम्मद अली रा. फारूखनगर आणि शेख सलमान शेख युसूफ रा. फारूख हे दोघे पण असल्याची माहिती शेख जुबेर उर्फ जे.डी.ने दिली. यासंदर्भाने पोलीस अंमलदार भानुदास वडजे यांनी पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण यांना पत्र देऊन शेख जुबेर उर्फ जे.डी. शेख कदीर हा जबरी चोरी करणारा गुन्हेगार वैद्यकीय प्रमाणपत्रसह त्यांच्याकडे स्वाधीन केला आहे. या शेख जुबेरचे साथीदार शेख इस्माईल उर्फ चोली हा लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 232/2021 कलम 394, 302, 34 भारतीय दंड संहितेच्या नुसारच्या गुन्ह्यात अटकेत आहेत. तसेच शेख सलमान शेख युसूफ हा गुन्हेगार शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. 379/2021 कलम 392, 395 भारतीय दंड संहिता या गुन्ह्यात तुरूंगात आहे. या दोघांना ताब्यात घेऊन 21 ऑगस्ट 2021 रोजी घडलेल्या गुन्ह्याचा कायदेशीर तपास करण्याची विनंती या पत्रात लिहिलेली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने उघड केला