नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या 22 वर्षीय युवकाला सहा महिने सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड शिक्षा ठोठावल्याचे आदेश पोक्सो कायद्याचे विशेष न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी जारी केले आहेत.
ईस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटूंबातील आई-वडील बाहेरगावी मजुरीसाठी गेले असतांना त्या घरात दोन बहिणी एकट्याच होत्या. दि.9 जून 2019 रोजी 14 वर्षे 9 महिने वय असलेली एक बालिका नैसर्गिक विधीसाठी गावखोरीत गेली. ही वेळ सकाळी 7 वाजेची होती. त्यावेळी रस्त्याने समोरून आलेल्या गावातील एका 22 वर्षीय युवकाने तिला मिठी मारून तु मला खुप आवडतेस असे सांगितले. अचानक घडलेल्या या घटनेने गांगरलेली बालिका जोरात ओरडली. तेंव्हा गावातील इतर मंडळी धावत त्यांच्याकडे आली. तेंव्हा बालिकेला वाईट उद्देशाने स्पर्श करणारा युवक पळून गेला. संध्याकाळी आई-वडील आल्यानंतर त्या बालिकेने घडलेला प्रकार आई-वडीलांना सांगितला. त्यानंतर पोलीस ठाणे ईस्लापूर येथे तक्रार देण्यात आली. ईस्लापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 26/2019 भारतीय दंडसंहितेच्या कलम 354 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक व्ही.पी.विठुबोने यांनी केला. या प्रकरणात बालिकेने सांगितल्याप्रमाणे मारोती किशन डोईफोडे (22) यास अटक झाली.
न्यायालयात हा विशेष सत्र खटला क्रमांक 28/2019 दाखल झाला. या खटल्यात एकूण 7 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालय समक्ष नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी मारोती किशन डोईफोडेला सहा महिने सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड. सौ.एम.ए.बतुल्ला(डांगे) यांनी मांडली.ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर मद्रेवार यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले.