30 तासात झालेल्या बायोडिझेलच्या दुसऱ्या कार्यवाहीचा गुन्हा 28 तासानंतर दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-30 तासात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या नेतृत्वात झालेल्या बायोडिझेल कार्यवाहीचा गुन्हा 28 तासानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकाही व्यक्तीचे नाव आरोपी या सदरात लिहिलेले नाहीत.
दि.21 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 9 वाजेदरम्यान म्हाळजा शिवारातील गट क्रमांक 12/25, आसना ते वाजेगाव रस्त्याच्या पश्चिम बाजूला एम.खान मोटार गॅरेज येथे महसुल पथकाने जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या नेतृत्वात छापा टाकला. त्या ठिकाणी एम.खान नावाचा व्यक्ती आणि त्याचे इतर मदतनीस प्लॅस्टिकच्या टाक्यामध्ये एका टॅंकरमधून विना परवाना, अवैधरित्या बायोडिझेल विक्री करत होते. याबाबत चंद्रकांत प्रभू कंगळे या मंडळाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत सर्व मुद्देमालाचा पंचनामा करून तक्रार देण्यास उशीर झाला अशी नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यात एम.खान मोटार गॅरेज व इतर असे नाव आरोपीच्या सदरात लिहिले आहे. खुलास्यामध्ये मात्र एम खान नावाचा व्यक्ती असेपण लिहिलेले आहे. या गॅरेजमधून 4 हजार 100 लिटर बायोडिझेल साठा, प्लॅस्टीकच्या टाक्या, 20 हजार लिटर क्षमतेचा टॅंकर क्रमांक एम.एच.04 सी.जी.4332 व इतर साहित्य असा एकूण 10लाख 19 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रकांत प्रभु कंगळे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी जीवनावश्यक वस्तु/ अत्यावश्यक वस्तु कायदा कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा क्रमांक 885/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तबगार पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *