गोरक्षण भागातील एक पडके घर पाडण्यासाठी मनपाने वापरली ताकत 

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनपा मालमत्ता क्रमांक असलेल्या जागेवरील टिनशेड आणि इतर साहित्य काढून नेले आहेत. याबद्दल या जागेच्या ताबेदार महिला वाजेदा बेगम सय्यद दाऊद यांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली आहे. पण ती तक्रार शिवाजीनगर पोलीसांनी घेतली की नाही याबाबत माहिती प्राप्त झाली नाही. 
                  आज दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास गोरक्षण मधील रमामाता आंबेडकर नगर वस्तीत, मनपाच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये मनपाचे अधिकारी पोकलॅंड सह पोहचले. तेथे मालमत्ता क्रमांक 1-24-232 येथे विटा रचून टिनशेड असलेले घर पाडण्यास सुरूवात केली. याबद्दल तेथील नागरीकांनी मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते घर पाडण्याबाबत कोणतेही आदेश मनपा अधिकारी दाखवत नव्हते. आमच्या साहेबाला बोला, सरकारी कामात अडथळा करू नका असे शब्द वापरत होते. अखेर मनपा अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात ते घर पाडलेच. 
                        याबद्दल या घराच्या मालम महिला वाजेदा बेगम सय्यद दाऊद यांनी एक तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पण ही तक्रार शिवाजीनगर पोलीसांनी घेतली की नाही याबद्दल कोणी दुजोरा दिला नाही. या तक्रारीमध्ये मालमत्ता क्रमांक 1-24-232 म्हणून ती मालमत्ता त्यांनी 30 वर्षापुर्वी फौजी नावाच्या माणसाकडून विकत घेतली आहे. या जागेचे मोजमाप 20 फुट लांब आणि 25 फुट रुंद असे आहे. विटा रचलेले बांधकाम असल्याने हे पावसाने पडत गेले. माझ्याकडे मनपाची सन 2020-21 ची टॅक्स भरलेली पावती आहे. मनपाच्या लोकांनी कोणतीही माहिती किंवा नोटीस न देता आमचे घर पाडून त्यातील साहित्य सोबत नेले आहे. हा प्रकार सुरू असतांना मनपाच्या लोकांनी मला व माझ्या मुलीला ढकलून दिले आणि तुमच्याविरुध्द पोलीस केस करतो अशी धमकी पण दिली. ही घटना घडतांना त्या ठिकाणी अजय गोपीवार, मनवर खान आणि इतर मंडळी होत्या. त्यांनी आमच्या वरील अत्याचार पाहिलेला आहे. तरी कोणीही नोटीस न देता माझे घर पाडून त्याचे साहित्य नेणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी असे अर्जात लिहिले आहे. या संबंधाने अजय गोपीवार म्हणाले जागा मनपाचीच आहे, सर्व वस्ती बेकायदेशीर आहे अशा परिस्थिती मनपा अधिकाऱ्यांनी फक्त एकच घर पाडले हा प्रकार म्हणजे महानगरपालिकेची दादागिरी आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *