औरंगाबाद विभागातील अनेक नगर परिषदा आणि नगर पंचायतींवर प्रशासक

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींची मुदत समाप्त झाली आहे. त्या ठिकाणी त्या विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (नवी-2) महेश पाठक यांनी जारी केले आहेत.
जगभरात कोविडमुळे झालेले संक्रमण आणि त्यामुळे भारतात पडलेला त्याचा प्रभाव यामुळे अनेक सार्वत्रिक निवडणुका वेळेवर पार पडल्या नाहीत. कांही ठिकाणी निवडणुक झाली आहे. पण अद्याप निकाल आलेले नाहीत. कांही ठिकाणी अजून निवडणुका व्हायच्या आहेत. यामुळे शासनाने संबंधीत नगर परिषदा आणि नगर पंचायतींवर प्रशासक नियुक्त केले आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड , उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, माहूर या नगर पंचायती, देगलूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी या नगर परिषदांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद या नगर परिषदांवर प्रशासक नियुक्त झाला आहे. जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, परतूर नगर परिषदांचा समावेश या आदेशात आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पुर्णा आणि सोनपेठ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी, बीड जिल्ह्यातील बीड, अंबेजोगाई, माजलगाव, परळी (वै.), गेवराई आणि धारुर. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, भुम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परंडा, तुळाजापूर. लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा या नगर परिषदांवर प्रशासक नियुक्त झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *