नांदेड(प्रतिनिधी)-विक्की ठाकूरचा खून करणाऱ्या गॅंगमधील 11 जणांविरुध्द 28 डिसेंबर रोजी मकोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे दोषारोपपत्र इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोेरे यांनी दाखल केले आहे.
दि.20 जुलै 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्यासुमारास शहरातील गाडीपुरा भागात विक्की दशरथसिंह ठाकूर याचा खून करण्यात आला. सोबतच त्याचा मित्र सुरज खिराडे याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यादिवशी मारेकऱ्यांनी हुलकावणी देण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या टोप्या परिधान केल्या होत्या. त्यामुळे दोन सामाजिक गटांमध्ये भांडण व्हावे आणि ती आग संपूर्ण शहरात पसरावी असा त्या मागचा उद्देश होता. पण पोलीसअधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या नेतृत्वात इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी प्रकरणाचे सत्य कांही तासातच समोर आणले आणि विक्की ठाकूरचा खून कैलास बिघानीया आणि त्याच्या गॅंगने केला होता ही सत्यता समोर आणली. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 176/2021 मध्ये पुढे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी दिलेल्या परवानगीनंतर मकोका कायद्याची वाढ करण्यात आली. यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्याकडे वर्ग झाला.
याप्रकरणात अटक आरोपी नितीन जगदीश बिघानीया, दिगंबर टोपाजी काकडे, मुंजाजी उर्फ गब्या बालाजी धोंगडे, लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे पाटील, गंगाधर अशोक भोकरे, सोमेश उर्फ सौम्या सुरेश कत्ते, कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंह परदेशी, कैलास जगदीश बिघानीया यांच्यासह बिघानीया कुटूंबातील दोन महिला अशा 11 जणांबद्दल मकोका कायद्यानुसार अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्रसिंह यांनी दोषारोप पत्र दाखल करण्याची परवागनी दिल्यानंतर डॉ.सिध्देश्र्वर भोेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 28 डिसेंबर रोजी 11 जणांविरुध्द मकोका न्यायालय नांदेड येथे दोषारोपपत्र दाखल केले आहे. मकोका कायद्याअंतर्गत नांदेड पोलीसांनी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात बरेच खटले दाखल केले आहेत. त्यामुळे गुन्हेगार मंडळी सध्या तुरूंगाच्या वास्तव्यात आहेत.
बिघानिया गॅंगच्या दोन महिलांसह 11 सदस्यांविरुध्द मकोका कायद्याअंतर्गत दोषारोप दाखल