नांदेड(प्रतिनिधी)-ओमीक्रॉन विषाणुचे संकट दाखवून आजपासून निर्बंध कडक करण्यात आले. पण दुसरीकडे हॉटेल व्यवसायीकांनी न्यु इअर पार्टी आयोजित करून शासनाच्या कडक निर्बंधांना एका प्रकारे ठंेंगाच दाखवला आहे. निर्बंधातील पार्टी कोणाच्या भाकरीवर तुप आणेल. हा एक प्रश्न या निमित्ताने चर्चेस आला आहे.
ओमीक्रॉनचे संकट वाढतच चालले आहे. मुंबईमध्ये तर काल एकाच दिवशी कोरोना रुग्ण संख्या डबल झाली. सोबतच देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा आदींसह 11 राज्यांमध्ये ओमीक्रॉनचा धोका जास्त असल्याचे सांगण्यात आले. कालच आजपासून नवीन कडक निर्बंध लागू करण्यात आले. मागील कांही दिवसांमध्ये कांही राजकीय नेत्यांच्या लग्नाचे सोहळे कोरोना निर्बंधाला झुगारुन झाले. त्यावेळी कायद्याची अंमल करणारी यंत्रणा पोलीस विभाग त्या लग्नांच्या समारोहांमध्ये बंदोबस्त करतांनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. कांही गावांमध्ये धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम झाले. त्यात सुध्दा कोरोना निर्बंधाच्या संदर्भाने कोणताही प्रभाव दिसला नाही. ओमीक्रॉनच्या संकटानंतर सर्वात मोठा प्रश्न लहान बालकांचा आहे. अमेरिकेमध्ये अत्यंत जलदगतीने लहान बालकांना ओमीक्रॉनने आपल्या कक्षेत ओढले आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती भयावह आहे.
शासनाच्यावतीने निर्बंध लागू होत आहेत. पण हे निर्बंध फक्त गरीबांसाठी आहेत काय? एखाद्या छोट्या माणसाच्या घरी लग्न असेल, इतर कांही कार्यक्रम असतील तर त्यावर कार्यवाही होईल आणि मोठ्या लोकांवर होणार नाही काय? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. कायदा हा सर्व सामान्य माणसासाठी आहे असे भारतीय संविधान सांगते. कायद्याच्या कक्षेत गरीब- श्रीमंत, विद्वान-मुर्ख असा कांही फरक नाही. त्यामुळे कोरोना विषयक कार्यवाही सुध्दा त्याचप्रमाणे झाली पाहिजे. सर्वच जण सांगतात भारतात कायदा सर्वात मोठा आहे. पण सर्वात मोठ्या कायद्याची पायमल्ली सुध्दा मोठी मंडळीच करतात.
अशा सर्व पार्श्र्वभूमीवर नांदेडमध्ये सुध्दा अनेक हॉटेलसनी न्यु इअर पार्टी आयोजित केली आहे. असाच कांहीसा प्रकार राज्यभरात आणि देशभरात आहे. पण या न्यु इअर पार्टीवर कोण लक्ष ठेवील हा प्रश्न तेवढाच महत्वपूर्ण आहे. नांदेडच्या हॉटेलमध्ये 800 -1200 रुपयांमध्ये एक न्यु इअर पार्टीमध्ये सहभागी होता येते. त्यात जेवण या फिसमध्ये देण्यात येते तसेच मद्यआपल्या वेगळ्या पैशांनी प्यावे लागणार आहे. पार्टीमध्ये डी.जे.चा उपयोग केला जाणार आहे याचा अर्थ ध्वनी प्रदुषणाची पायमल्ली होणारच आहे. सर्व सामान्य माणसांना बंदीस्त रुममध्ये 50 लोकांपेक्षा जास्त मंडळी एकत्र आणता येणार नाही मग या न्यु इअर पार्टीमध्ये 50 जणंच असतील काय याची शहानिशा कोण करणार?
कांही नेते मंडळी सांगतात जसे कायदे तयार होतात तशा त्यातून पळवाटा पण तयार होता. पळवाट आली म्हणजे त्यासाठी खर्च आला आणि हा खर्च प्रशासनातील कोणत्या विभागाच्या लोकांना त्यांच्या भाकरीवर तुप उपलब्ध करून देणार हा मोठा प्रश्न आहे. एकूणच निर्बंध कोरोनाचे आणि गल्ला भरायचा आपला असा प्रकार या कोरोनाच्या नवीन निर्बंधामुळे तयार होत आहे. आजच्या न्यु इअर पार्टीला नव्हे तर न्यु इअर पार्ट्यांना शुभकामना देण्याशिवाय आम्ही तरी काय करणार ?
