रामप्रसाद खंडेलवाल
उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याची प्रथा भारतीय समाजात रुढ आहे. असेच आज रात्री 12 वाजता नवीन सुर्योदय घेवून सन 2022 सुरू होणार आहे. त्याचे स्वागत करतांना आपल्या मागील वर्षाच्या आठवणी न विसरता पुढे चालले पाहिजे तरच 2022 मध्ये घडणाऱ्या बदलांचा स्विकार आम्ही समर्थपणे केला तर आम्हाला दमदारपणे जीवन जगता येणार आहे.
सन 2021 अर्थात तिसऱ्या सहस्त्राब्दीमधील 21 वे वर्ष अर्थात 21 वी शताब्दी सुरू आहे. त्यातील पहिले दोन दशक संपलेले आहेत. तिसऱ्या दशकातील नवीन वर्ष 2022 आज रात्रीपासून सुरू होणार आहे. सामाजिक संकेतस्थळांवर विविध विनोदांच्या माध्यमातून असे करू, तसे करा, हा निर्णय घ्या, ही शपथ घ्या, अशा अनेक वल्गना कालपासूनच सुरू झाल्या आहेत. या वल्गनांपेक्षा प्रत्यक्षात असा विचार करण्याची गरज आहे की, आम्ही सन 2021 मध्ये काय केले, आम्हाला काय मिळाले, आम्ही त्याला कसा प्रतिसाद दिला आणि आम्ही नवीन वर्षात कसे जगणार आहोत. याचा एक आराखडा बांधला पाहिजे तरच आम्हाला जगता येईल. दररोजची पहाट झाल्यावर पाखरे उंच उडतात. त्यांना सुध्दा वादळे भिती घालत असतात पण त्या वादळांच्या भितीला न घाबरता ही पाखरे आपल्या दररोजच्या जीवनातील उडण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. आम्ही कितीही वर गेलो तरी आम्हाला हे लक्षात घेतले पाहिजे की आमच्या खाली सुध्दा कोणी आहे. हा विचार करतांना आम्हाला त्या आमच्या खालील लोकांचा विचार ठेवल्यानंतर आमच्यातली माणुसकी दिसेल. आपल्या असण्याचा आणि आपल्या वास्तव्याची आठवण सोडून पुढे चालणारी नदी कोणत्याच रस्त्याला सोडत नाही. त्याचप्रमाणे आमच्या जीवनात आलेल्या रस्त्यांवरील विविध वळणे पार करतांना आम्हालाच वळावे लागते. रस्ता आमच्यासाठी कधीच सरळ होत नसतो. पण आम्ही “मी असा आहे, मी असे करु शकतो, मी दाखवून देतो, मी सगळ्यांची हवा काढतो’ या वाक्यांमध्येच अडकलो आहोत आणि त्यातच आम्हाला आमच्या जीवनात एका मर्यादीत चौकटीत जगावे लागत आहे. त्या चौकटीच्या बाहेर जावून जगण्याची हिंमत दाखविण्याची गरज आता सन 2022 मध्ये आहे. वास्तव न्युज लाईव्हने सहा महिन्यापुर्वी सुरू केलेल्या कामाला आज 31 डिसेंबर रोजी सहा महिने आणि 11 दिवस पुर्ण होत आहेत. आमच्या लेखणीला आम्ही नेहमीच असे सांगितले उठ आणि संवाद कर आणि शब्दांना जिंदाबाद कर. कोणत्याही एका रेषेवर चालतांना जे कांही करायचे आहे ते अपवादात्मक कर. या पध्दतीने चालत असतांना आम्हाला सुध्दा अनेक काटेरी वळणांवरून वळतांना बऱ्याच जखमा झाल्या. पण आम्ही आमची वृत्ती सोडली नाही आणि त्या वृत्तीमुळे आम्ही आजही त्रासात सुध्दा हसत जीवन जगलो.
अशा पध्दतीने सन 2022 मध्ये काय व्हावे हे सांगत असतांना सन 2021 मध्ये आमच्या लिखाणाने कोणाचे मन दुखावले असेल तर आम्ही त्याबध्दल आज जाहिर क्षमा मागतो आहोत. ही क्षमा मागत असतांना आमचे काय चुकले हे सुध्दा विचारण्याची हिंमत आमच्यात आहे. आम्ही चुकलो असेल तर आम्ही कायद्यापेक्षा मोठे नाहीत. कांही बोगस लोकांनी आमच्याविरुध्द बोगस खटले सुध्दा दाखल केलेले आहेत. ज्यांना मराठी भाषेचे ज्ञानच नाही त्यांनी आमच्या मराठी शब्दांना कायद्याच्या कक्षेत बसविण्याचा केलेला प्रयत्न न्यायालय सोडवेल. याचा आम्हाला विश्वास आहे. आमच्या लिखाणाची क्षमा मागतांना कवी जगदीश खेबुडकरांनी आमच्या डायरीवर लिहिलेले दोन वाक्य लिहावेसे वाटतात. “पत्रकाराची लेखणी दुधारी, लागू नये कोणाच्या जिव्हारी’ या शब्दांना विचार करूनच आम्ही कवीवर्य जगदीश खेबुडकरांना आमच्या लेखणीचे कांही कागद दाखवले होते. त्यावरच त्यांनी आमच्या दररोजच्या नोटस डायरीवर हे शब्द लिहिले होते. आम्ही आजही जगदीश खेबुडकरांनी आम्हाला दिलेल्या शिक्षणापेक्षा वेगळे लिहिण्याची हिंमत करणार नाही. पण इतरांनी चुका करायच्या आम्ही फक्त जगदीश खेबुडकरांच्या शब्दांवर चालायच अशी अपेक्षा असेल तर त्यांनीपण समाजाच्या जिव्हारी लागणारे कृत्य करू नयेत. म्हणजे आम्हाला लिहायला संधी मिळणार नाही. आम्ही काचाचे तुकडे होवून जगण्यात विश्र्वास ठेवत नाहीत तर आम्ही आरसा होवून जगण्यावर विश्र्वास ठेवतो. कारण काचाचे तुकडे पायाला बोचतील म्हणून कोणी त्यांच्या जवळ येत नाही आणि आरसा दिसला तर त्यात कोणी पाहिल्याशिवाय राहत नाही.
सन 2021 च्या जानेवारीची सुरूवात भितभितच झाली. कारण कोरोना विषाणुने आपला प्रभाव दाखवला होता. कोरोना काळात मार्च 2020 ते जानेवारी 2021 हा कालखंड भारताचाच नव्हे तर जगाच कोविडच्या घशात गेला. च्या नंतर जानेवारी 2021 सुरू झाले तोपर्यंत कांही-कांही प्रमाणात सर्व कांही नियम व अटीसह सुरू झाले. 2021 मध्ये भारताच्या अनेक जवानांनी पाकिस्तान सोबत लढतांना, नक्षलवाद्यांसोबत लढतांना आपल्या प्राणांची आहुती दिली.नांदेड जिल्ह्यातील सुध्दा दोन जवांनी आपले प्राण भारतीय जनतेच्या रक्षणार्थ वाहिले. नांदेड जिल्ह्यात अनेक निवडणुका लांबल्या होत्या. त्या हळूहळू होत गेल्या. अनेक मान्यवरांनी आपल्या जीवनाचा शेवट कोरोनामध्ये केला. तसेच काही जणांनी आपले जीवन संपल्यामुळे आमचा निरोप घेतला. शहरातील गुंडांनी बऱ्याच जागी आपले अस्तीत्व दाखवतांना खून केले, लुट केली तरीपण पोलीस विभागाने त्यांना जेरीला आणले. आज जवळपास दोन खंडी गुंड तुरूंगात आहेत. त्यात एका पोलीस निरिक्षकाचा सुध्दा समावेश आहे. कोविड कालखंडामुळे शासनाचा निधी साठा आटला होता. त्यात सुध्दा नांदेड जिल्ह्यासाठी काम करतांना ना.अशोक चव्हाण यंानी भरपूर निधी उपलब्ध केला. त्या निधीतून काही कामे नक्कीच चांगली झाली. आजही कांही कामांमध्ये नक्कीच घोळ आहे.
सन 2022 सुरू होतांना ओमीक्रॉन या विषाणुचे संकट भारतावर आलेले आहे. महाराष्ट्रातसुध्दा कोरोना रुग्ण संख्या मागील तीन दिवसात झपाट्याने वाढत आहे.तेंव्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचा विचार न करता आपल्या आणि आपल्या कुटूंबाचा विचार करून तरी जनतेतील प्रत्येकाने कोविड नियमावलीचे पालन योग्य केले पाहिजे तरच सन 2022 मध्ये आम्ही योग्यरितीने जगू नाही तर कांही शास्त्रज्ञ सांगतात ओमीक्रॉन विषाणुची सुनामी येणार आहे. आणि सुनामी आल्यावर काय होते. हे शब्दात लिहिण्याची गरज काय? अनेक फंद्यांमध्ये झुलून पण आमचे प्राण बाकी राहिले याही पुढे आमच्या अजून अनेक परिक्षा बाकी आहेत. आमच्या घरात आगीचे वास्तव्य तर सोडाच पण दिवा पण लागला नाही. तरीपण धुरांचे अनेक आसमंत आम्हाला पाहायचे आहेत. यापध्दतीने जगलात तर सन 2022 मध्ये दिसणारे बदल आम्ही स्विकारू आणि दमदारपणे जीवन जगू. निवड, संधी आणि बदल या तीन गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात महत्वपूर्ण आहेत. संधी दिसल्यावर त्याची निवड करता आली तर बदल आपोआप होतो. संधी समोर दिसत असतांना सुध्दा त्याची निवड करता आली नाही तर त्या व्यक्तीमध्ये कधीच बदल घडत नाही. सन 2022 मध्ये संधी दिसल्यावर त्याची निवड करा आणि आपल्या जीवनात बदल घडवा एवढीच अपेक्षा.
