नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील मालेगाव रस्त्यावर एक न्यू इअर पार्टी एकाचा जीव घेऊन गेली आणि सोबतच्या मित्रांना तुरुंगात पाठवण्याच्या तयारीतून नवीन वर्षाची पहाट उगवली.
शहरातील मालेगाव रस्त्यावर श्री गजाजन बाबा मंदिराजवळ काही मित्रांनी तिसऱ्या मजल्यावर अर्थात गच्चीवर न्यू इअर पार्टी आयोजित केली.अनेक मित्रांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात मद्याच्या पेगने झाली. मद्याचे पेग आत जातात तेव्हा रोरिंग सुरु होते.मग तो राजा बनतो. आणि सुरु होतो भांडणाचा प्रताप.असाच प्रताप या गच्चीवर झाला आणि काही मित्रांनी आपल्याच मित्राला उचलून गच्चीवरून खाली फेकून दिले.तो तर लगेच गतप्राण झाला.त्याचे नाव संतोष हळदेकर असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले.त्यांनी तेथून संतोष हळदेकरच्या काही मित्रांना ताब्यात घेतले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.पुढील कायदेशीर प्रक्रिया अद्याप वृत्त लिही पर्यंत पूर्ण झालेली नव्हती. अश्या प्रकारे एक मित्र वैकुंठवासी झाला आणि अनेक मित्र आता तुरुंगात जाणार असे भयानक चित्र नव वर्षाच्या सुरुवातीला नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळाले.