नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना कौठा भागातील नरसींह मंदिराजवळ ४८ तास बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी २ लाख रुपये रोख रक्कम आणि अंदाजे ८ तोळे सोने चोरल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. या घटनेचा सर्व सविस्तर अभिलेख अद्याप तयार झाला नसल्याने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
शहरातील जुना कौठा भागात बसवेश्वरनगर नरसींह मंदिराजवळ लेखापाल असलेल्या मारोती लालू पासवाड यांचे घर आहे. १ जानेवारी रोजी त्यांनी आपले घर बंद करून पारंपारीक येळ अमावस्येच्या निमित्ताने सर्व कुटूंबासह आपल्या गावाकडे गेले होते. आज दोन दिवसानंतर दुपारी ते घरी परत आले तेंव्हा त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडलेला होता. तपासणी केली तेंव्हा घरात एका पिशवीमध्ये ठेवलेले २ लाख रुपये आणि कपाटातील जवळपास ८ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांचे इतर सहकारी त्या घरात जावून तपासणी करून आलेे आहेत. सोबतच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार या घटनेचा संपूर्ण अभिलेख तयार करत आहेत. त्यामुळे अद्याप, वृत्तलिहिपर्यंत या चोरी संदर्भाने कोणत्याही गुन्ह्याची नोंद नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली या बाबीला कोणीच दुजोरा दिलेला नाही.
जुना कौठा भागात एक घर फोडून २ लाख रुपये रोख व अंदाजे ८ तोळे सोने चोरी झाले