चार चोरट्यांना पकडल्यानंतर त्यांची रवानगी पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-शनिवार, रविवारच्या सुट्टीचा फायदा घेवून चार चोरट्यांनी एक शाळा फोडून त्यातील संगणक साहित्य चोरले. या साहित्याची किंमत 1 लाख रुपये आहे. इतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल होताच चार तासाच्या आत चार चोरट्यांना गजाआड केले. आज 4 जानेवारी रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी या चोरट्यांना दोन दिवस पोलीस कोठडी पाठविले आहे. शाळेतून चोरलेले सर्व साहित्य पोलीसांनी जप्त केले असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
1 जानेवारी शनिवार आणि 2 जानेवारी रविवार या दोन दिवसांच्या सुट्टीच्या कालखंडात रहेमतनगर, उस्मानपुरा, फसीयोद्दीन यांच्या घरात असलेली डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल कांही चोरट्यांनी फोडली. 3 जानेवारी रोजी शाळेचे मुख्याध्यापक शेख अब्दुल कलीम अब्दुल अजीज हे सकाळी 7.30 वाजता शाळेत आले तेंव्हा संगणक कक्षातील 10 संगणक सापडले नाहीत. याबाबत शाळेतील इतर लोकांसोबत तपासणी केली तरीपण संगणक सापडले नाहीत. त्यानंतर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डुप्लीकेट चाबीने कुलूप उघडून शाळेतील दहा संगणक चोरीला गेले आहेत.
या बाबत गुन्हा क्रमांक 6/2022 कलम 457, 380 भारतीय दंड संहितानुसार दाखल झाला. इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे आणि इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला. शेख असद यांनी आपले सहकारी पोलीस अंमलदार हबीब चाऊस, विक्रम वाकडे, मानेकर, राजघुले, शेख समीर, दासरवाड यांच्यासह मेहनत करून या प्रकरणातील चार चोरटे गजाआड केले.
पकडलेल्या चोरट्यांना आज शेख असद, बंडू कलंदर, नरहरी कस्तुरे, गजानन केंद्रे, बालाजी पवार यांनी न्यायालयात हजर केले. त्यांची नावे मोहम्मद फेरोज मोहम्मद सलीम (28) रा.बिलालनगर, शेख आवेज शेख हबीब (24) रा.इकबालनगर, मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद फारुख (21) रा.रहेमतनगर, शेख शोएब शेख हबीब (19) रा.मोहम्मदीया कॉलनी अशी आहेत. पोलीसांनी केलेला युक्तीवाद ग्राहय मानुन न्या.प्रविण कुलकर्णी यांनी या चार चोरट्यांना दोन दिवस पोलीस कोठडी पाठविले आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल होताच चार तासात या चार चोरट्यांना जेरबंद करणाऱ्या पोलीसांनी त्यांनी चोरलेले सर्व संगणक साहित्य जप्त केले आहेत.