नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबरच्या मध्यरात्री न्यु इअर पार्टीमध्ये आपल्या मित्राचा खून करणाऱ्या चार मारेकऱ्यांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मयुरा यादव यांनी या चौघांची पोलीस कोठडी 8 जानेवारी 2022 पर्यंत अशी तीन दिवस वाढवून दिली आहे.
31 डिसेंबर रोजी रात्री सिध्दीविनायकनगर भागातील फ्लॅट क्रमांक 14 मध्ये न्यु इअर पार्टी झाली. या पार्टीमध्ये संतोष वामनराव भालेराव (30) याला सोपान बालाजी नेवल पाटील (33), गणेश व्यंकटराव कदम(29), माधव ग्यानबा बोलके (34), मारोती नवाजी बोलपल्लेवाड(28) या चौघांनी मारहाण करून संतोष भालेरावला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. ज्यामुळे संतोष भालेरावचा मृत्यू झाला.
भाग्यनगर पोलीसांनी श्वेता संतोष भालेराव यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 3/2022 दाखल केला आणि चार मारेकऱ्यांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे यांच्याकडे देण्यात आला. दि.2 ते 5 जानेवारी अशी पोलीस कोठडी या चार मारेकऱ्यांना देण्यात आली होती. आज दि.5 जानेवारी रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे, पोलीस अंमलदार संतोष वच्चेवार, मारोती मुसळे, ओमप्रकाश कवडे, शेख युसूफ यांनी या मारेकऱ्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. ती न्या. मयुरा यादव यांनी 8 जानेवारी, 3 दिवस वाढवून दिली आहे.
संतोष भालेरावचा खून करणाऱ्या चार मारेकऱ्यांची पोलीस कोठडी वाढली