शारदानगर खून प्रकरणातील तीन मारेकरी 11 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-शारदानगर येथे 22 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या तीन जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी 11 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा येथे लिपीक पदावर कार्यरत असलेले रमेश सखाराम धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.5 जानेवारीच्या सायंकाळी 7 ते 7.15 या 15 मिनिटाच्या वेळेत शारदानगरमधील राज रेसीडेन्सीसमोर त्यांचा मुलगा विशाल रमेश धुमाळ (22) यास अक्षय उर्फ माधव आनंदा हळदे (21) रा.शिवनगर, शुभम उर्फ सुभाष दिगंबर सोनगावकर (19) रा.सरपंचनगर आणि विनायक तुकाराम सोनटक्के (18) रा.डीमार्टजवळ या तिघांनी तिक्ष्ण हत्याराने विशाल धुमाळवर वार करून त्याचा खून केला. या बाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 2/2022  कलम 302, 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल करण्यात आला.
विमानतळचे पोलीस निरिक्षक संजय ननवरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी कांही तासातच विशालच्या तिन मारेकऱ्यांना जेरबंद केले. आज दि.7 जानेवारी रोजी गुन्ह्याचे तपासीक अंमलदार एन.आर.आनलदास, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, बंडू कलंदर, रामदास सूर्यवंशी यांनी पकडलेल्या तिन मारेकऱ्यांना न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. मोहम्मद रजियोद्दीन यांनी या प्रकरणी न्यायालयासमक्ष पोलीस कोठडीच्या आवश्यकतेचे मुद्दे सविस्तरपणे मांडले. युक्तीवाद ऐकून न्या.एन.एल. गायकवाड यांनी तिन्ही मारेकऱ्यांना 11 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *