नांदेड(प्रतिनिधी)-शिराढोण तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वार्ताहर गोपीनाथ धनाजी पवार (41) हे दि.07 जानेवारी रोजी नांदेड ते बिदर या राष्ट्रीय महामार्गावरील तेलंगवाडी पाटील जवळ मोटारसायकलच्या किरकोळ अपघातात जखमी झाले असता नांदेड येथे रुग्णालयात उपचार घेतांना आज दि.09 रोजी त्यांचे निधन झाले.
कंधार तालुक्यातील शिराढोण तांडा येथील रहिवासी गोपीनाथ पवार हे सिडको येथील कार्यक्रम अटपून शिराढोणकडे निघाले असता रस्त्यातच त्यांच्या दुचाकीचे ब्रेक निकामी झाल्याने त्यांचा अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा 9 जानेवारी रोजी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर त्यांच्या मुळ गावी शिराढोण तांडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येेने उपस्थित होते. शिराढोणचे उपसरपंच पांडूरंग धनाजी पवार यांचे ते बंधू होते.