
नांदेड(प्रतिनिधी)-आज दशम पातशाह श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांचे प्रकाशपर्व (जयंती) अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड शहरातून काढलेल्या नगर किर्तनाने आज या प्रकाशपर्व सोहळ्याची सांगता झाली.
रात्रीपासूनच श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या (जयंती)निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचप्यारे साहिबान आणि गुरूद्वाराचे मुख्य जथेदार संतबाबा श्री कुलवंतसिंघजी यांनी अरदास करून या सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमास उपस्थिती दाखवली. अनेक लोकांनी दशम पातशाहच्या आठवणीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांचे समापन झाल्यानंतर सायंकाळी सचखंड श्री हजुर साहिब येथून श्री गुरूग्रंथ साहिबजी यांना एका पालखीत विराजमान करून नगरकिर्तन निघाले. नगरकिर्तन गुरुद्वारा चौक, महाविर चौक, वजिराबाद चौक, सरकारी दवाखाना, चिखलवाडी चौरस्ता अशा मार्गावरून सचखंड श्री हजुर साहिब येथे पोहचणार आहे.

नगर किर्तनात सर्व प्रथम बॅन्ड पथक त्यानंतर गुरूद्वारा येथील अश्व या मिरवणूकीत सहभागी झाले. त्यांच्या पाठोपाठ किर्तन करणारी मंडळी होती. सोबतच युवक मंडळी गदगा (शस्त्र प्रदर्शन) खेळात होते. त्यानंतर गुरू महाराजांच्या पालखीसमोर पाणी टाकून रस्ता झाडण्यात आला. त्यानंतर त्यावर पुष्पवृष्ठी करण्यात आली आणि पालखी त्या मागून येत होती. अनेकांनी दिवाबत्ती लावून पालखीचे दर्शन घेतले अनेकांनी पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद प्राप्त केले.
