गोवर्धनघाट येथे अतिक्रमण काढण्याच्या घटनेत दोन गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-गोवर्धनघाटजवळ अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अतिक्रमणाची तक्रार सहाय्यक आयुक्त राजेश अशोकसिंह चव्हाण यांनी दिली आहे. नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत  सुध्दा अतिक्रमण काढण्याच्या कारणावरुन राजेश चव्हाणविरुध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार देण्यात आली होती. त्या तक्रारीत राजेश चव्हाणच्या चुकीबद्दल त्यांच्या वरिष्ठांना पोलीसांनी कळवले आहे असे एक पत्र प्राप्त झाले आहे.
सहाय्यक आयुक्त राजेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गोवर्धनघाट टेकडी येथे 9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मनपा अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार गेले असतांना तेथे दगडफेक करून कांही जणांनी गडबड केली आणि त्यामुळे कोविड नियमावलीचे सुध्दा उल्लंघन झाले. या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी कांही जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 5/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे हे करीत आहेत.
दुसऱ्या एका तक्रारीनुसार त्यात पोलीस अंमलदार गंगाधर दत्ता कांबळे यांनी तक्रार दिली आहे की, 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान अतिक्रमण काढले जाणार आहे. या कारणावरून कांही जणांनी बेकायदेशीर जमाव जमवला आणि कोविड नियमावलीचे उल्लंघन केले. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 4/2022 नुसार नोंदवला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
या प्रकरणातील महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश चव्हाण यांनी मागील महिन्यात पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत एका भुखंडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी रात्री पोलीसांना पत्र न देता आणि भुखंडधारकांना नोटीस न देता खाजगी माणसांच्या सहाय्याने ते अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला होता. त्या भुखंडाबाबत न्यायालयात वाद चालू आहे असा अहवाल पोलीस उपनिरिक्षक जळबाजी गायकवाड यांनी तयार केला. या अहवालात पोलीसांना आणि भुखंड मालकाला नोटीस दिली नाही याबाबत राजेश चव्हाण यांच्या वरिष्ठांना रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे असे या अहवालात लिहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *