
नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे एका वयोवृध्द महिलेला हात-पाय बांधून आणि दुसऱ्या महिलेचे झोपलेले अवस्थेत दागिणे लुटून पळून गेलेल्या लुटारुला देगलूर पोलीसांनी एका 23 वर्षीय युवकाला जेरबंद करून त्याच्याकडून 100 टक्के चोरलेला ऐवज जप्त केला आहे.
दि.6 जानेवारी रोजी रात्री 1 ते 1.30 वाजेच्यासुमारास बायनाबाई शिवाजी कैकाडी या 75 वर्षीय महिला आपल्या घरात एकट्या झोपलेल्या असतांना एका चोरट्याने त्यांचे हात पाय बांधून त्यांच्या अंगावरील 67 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरले. तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या छपरात झोपलेल्या महिला निर्मलाबाई एकनाथ ढवळे यांच्या गळ्यातील 12 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र काढून घेतले. हा चोरटा दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.बी.5570 वर बसून पळून गेला होता. देगलूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 8/2022 दाखल केलेला आहे.
देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. त्यांना सहाय्यक पोलीस निरिक्षक कमलाकर गडीमे, संगम परगेवार, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत मोरे, पोलीस अंमलदार ज्ञानोबा केंद्रे, सुनिल पत्रे, कृृष्णा तलवारे, संजय येमलवाड, सुधाकर मलदोडे, वैजनाथ मोटरगे यांनी मदत केली. आपले सर्व कसब वापरून पोलीसांनी पिराजी चंद्रकांत होनलवार (23) रा.भोईगल्ली देगलूर यास 24 तासात अटक केली. सध्या हा चोरटा पिराजी होनलवार 13 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत आहे. देगलूर पोलीसांनी याच्याकडून चोरी गेलेला 79 हजार रुपयांचा 100 टक्के चोरीचा ऐवज जप्त केला आहे. सोबतच त्याची दुचाकी गाडी जप्त केली आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी देगलूर पोलीसांचे कौतुक केले आहे.