नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणातील एका आरोपीला नांदेड ग्रामीण पोलीसांनी आज न्यायालयात हजर केल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी त्यास तीन दिवस अर्थात 18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.21 डिसेंबर रोजी म्हाळजा शिवारात गट क्रमांक 12/5 सांगवी आसना ते वाजेगाव रस्त्याच्या पश्चिम बाजूला एम.खान मोटार गॅरेज येथे महसुल पथकाने धाड टाकली. त्या ठिकाणी मिनी पेट्रोलपंपच होते. एकूण 10 लाख 19 हजार 100 रुपयांचा ऐवज तेथून जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी मंडळ अधिकारी चंद्रकांत प्रभु कंगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 885/2021 दाखल झाला. त्यातील एका माणसाला 14 डिसेंबरच्या स्टेशन डायरी नोंद क्रमांक 41 प्रमाणे 20.29 वाजता अटक झाली त्याचे नाव शेख इमरान शेख मस्तान (35) रा.उमर कालनी देगलूर नाका असे आहे. पोलीसांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये असेच लिहिलेले आहे. स्टेशन डायरीचा वेळ आणि क्रमांक हाताने लिहिला आहे. बाकी सर्व टंकलिखीत आहे. त्या पकडलेल्या शेख इमरान शेख मस्तानला नांदेड ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी आज 15 जानेवारी 2022 रोजी न्यायालयात हजर केले.
सरकारी वकील ऍड. गिरिष मोरे यांनी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायाधीश खलाणे यांनी या बायोडिझेल प्रकरण्यातील आरोपीला 18 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. याप्रकरणात येथे सापडलेल्या ट्रक क्रमांक एम.एच.04 टी.व्ही.4332 या वाहनाचे अभिलेख तपासले असता हा ट्रक मधु बाबूलाल मेहता यांच्या नावे आहे. या ट्रक मालकाचा अटक आरोपीशी काय संबंध आहे हे शोधायचे आहे. तसेच मुख्य आरोपी मुदस्सर खान उर्फ एम.खान याचा मोबाईल क्रमांक हस्तगत करून त्याचा सीडीआर आणि एसडीआर तपासणे आहे. तो अजून पकडण्यात आलेला नाही.